लाऊडस्पीकर वादावरील सर्वपक्षीय बैठक संपली; ३ मे च्या अल्टिमेटमवर मनसे ठाम
राज्यात तापलेल्या लाऊडस्पीकर वादावल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी बोलावलेली सर्वपक्षीय बैठक आज पार पडली. या बैठकीय राज्य सरकारने स्वत: ची काही ठोस भूमिका न घेता भोंग्यासंदर्भात राज्य सरकार काही निर्णय घेऊ शकत नाही असं स्पष्ट केलं. या निर्णयानंतर आता मनसेची (MNS) पहिली प्रतिक्रीया समोर आली आहे.
राज्य सरकारने बोलावलेली सर्वपक्षीय बैठक आज पार पडली. मात्र या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) गैरहजर होते. बैठकीनंतर बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी भोंग्यासंदर्भात राज्य सरकार काही निर्णय घेऊ शकत नाही असं स्पष्ट केलं. तर दुसरीकडे बैठकीत सहभागी झालेले मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मात्र आपण भूमिकेवर ठाम असल्याचं सांगितलं.
बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) म्हणाले, “आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. आम्हालाही कायदा सुव्यवस्था उत्तम राखायची आहे. कुठेही गालबोट लागता कामा नये ही आमची भूमिका आहे. राज ठाकरेंनी भूमिका मांडली तेव्हा सुप्रीम कोर्टाचाच दाखला दिला होता. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे इतर धर्मीयांना मिळत आहे तशी आम्हाला परवानगी द्यावी.
“राज ठाकरेंनी अल्टिमेटम दिला आहे. आता राज्य सरकारने निर्णय घ्यायचा आहे. सुप्रीम कोर्टाने लाऊडस्पीकसंबंधी नियम सांगितले आहेत. वर्षभर लोकांना परवानगी देणार असं होत नाही,” असं बाळा नांदगावकर म्हणाले.