भाजप सत्यजित तांबेंना पाठींबा देणार का? विखे पाटलांचे मोठे विधान
राज्यात सध्या प्रचंड खलबत सुरु आहे. तर याच गोंधळा दरम्यान दुसरीकडे राज्यात विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यासाठी सर्वच पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु असताना दुसरीकडे मात्र, नाशिकच्या जागेबाबत मोठा पेच निर्माण झाला होता. काँग्रेसने विद्यमान आमदार सत्यजीत तांबे यांच्याऐवजी त्यांचे डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, अर्ज दाखल करताना ऐनवेळी काँग्रेसने सत्यजीत तांबे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे या निवडणुकीत वेगळे वळण निर्माण झाले आहे. त्यावरच आता भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठे विधान केले आहे.
नाशिक पदवीधर निवडणुकीबाबत बोलताना विखे पाटील म्हणाले की, निवडणूक प्रक्रियेमध्ये पक्षश्रेष्ठी निर्णय घेतात. त्यानंतर कार्य करायची आमची भूमिका असते. कोणाला उमेदवारी मिळते त्याची आम्ही वाट पाहत होतो. बरेचसे उमेदवार इच्छुक होते. आज उमेदवारी दाखल करायची शेवटची तारीख होती. भाजप जी भूमिका घेऊन काम करते, त्याचं स्वागत आहे. सत्यजीत तांबेंशी माझं बोलणं झालं नाही. त्यांच्याबद्दलचा निर्णय पक्षश्रेष्ठी करतील. पक्षाने त्यांना पाठिंबा दिला तर आम्ही सत्यजीतला पाठिंबा देऊ. असे स्पष्ट विधान विखे पाटील यांनी यावेळी केले.