अंधेरी पूर्व विधानसभा लढणार की शिवसेनेला पाठिंबा? कॉंग्रेसने स्पष्ट केली भूमिका

अंधेरी पूर्व विधानसभा लढणार की शिवसेनेला पाठिंबा? कॉंग्रेसने स्पष्ट केली भूमिका

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची घोषणा
Published on

मुंबई : राज्यात अभूतपूर्व गोंधळ घडल्यानंतर, आता निवडणूक आयोगाने सोमवारी अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. अशातच राष्ट्रवादी कॉंग्रेसनंतर आता कॉंग्रसनेही शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज घोषणा केली आहे. यामुळे शिवसेना विरुध्द शिंदे गट असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

या संदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जातीयवादी धर्मांत भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन झाली होती राज्यात अडीच वर्षे या महाविकास आघाडीचे सरकार होतं. या सरकारने शेतकरी कर्जमाफी सारखे अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. कोरोनासारख्या महाभयंकर संकट काळात देशात सर्वोत्तम काम केले. पण, सत्तापिपासू भारतीय जनता पक्षाने ईडी, सीबीआय या केंद्रीय संस्थाचा दुरुपयोग करून शिवसेनेच्या आमदारांना फोडून महाविकास आघाडी सरकार पाडले.

महाविकास आघाडी फोडण्याचे प्रयत्न भाजपने केले ते यशस्वी झाले नाहीत म्हणून त्यांनी शिवसेना पक्ष फोडला. भारतीय जनता पक्षाविरोधातील या लढाईत महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला उमेदवार देणार नसून शिवसेना पक्ष जो उमेदवार देईल त्याला निवडून आणण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते पूर्ण ताकदीने काम करतील, असे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचा दुबईत हदयविकारच्या झटक्याने मृत्यू झाला होता. यानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपने आपले उमदेवार अगोदरच जाहीर केले आहेत. आधीही हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यामुळे या निवडणुकीसाठी शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार का, हेदेखील पाहावे लागेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com