कसबा अन् चिंचवड मतदारसंघात मतदारांनी फिरवली पाठ; दोन्ही ठिकाणी झाले 'इतके' मतदान
एकीकडे राज्यात राजकीय घडामोडी घडत असताना दुसरीकडे अनेक दिवसांपासून पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीची चर्चा होत होती. सर्वच पक्षांनी या पोटनिवडणुकीसाठी कंबर कसली होती. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातच आज या दोन्ही जागांसाठी मतदान पार पडले. मात्र, विशेष गोष्ट म्हणजे यावेळी मतदारांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. कसबा विधानसभा मतदार संघात पाच वाजेपर्यंत 45.25 टक्के मतदान पार पडले तर चिंचवड विधानसभा मतदार संघासाठी 41.1 मतदान पार पडले. आता 2 मार्चला या मतदानाचा निकाल जाहीर होईल.
कसबा आणि चिंचवड या दोन्ही मतदारसंघात सकाळपासूनच मतदान संथगतीने सुरू असल्याचे दिसले. चिंचवडमध्ये दुपारी 1 ते 3 या वेळेत 30.55 टक्के मतदान झाले आहे. कसबा पेठ मतदारसंघात सकाळी 7 ते दुपारी 3 या वेळेत 30.05 टक्के मतदान झाले होते. तर शेवटी संध्याकाळी पाचपर्यंत कसबा विधानसभा मतदार संघात 45.25 टक्के मतदान झाले तर चिंचवड विधानसभा मतदार संघात 41.1 इतके मतदान झाले. या आकडेवारीवरून मतदारांमध्ये उदासीनता असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.