राजे कुठल्याही नेतृत्वापेक्षा मोठे आहेत; 'त्या' विधानावर विनोद पाटलांचे उत्तर
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अन्य महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या मराठा आरक्षणाविषयक बैठकीत मराठा नेत्यांमधील मतभेद समोर आले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाचे नेते विनोद पाटील यांनी मराठा क्रांती मोर्चा फोडणारा आणखी कोणता माईका लाल जन्माला आला नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
अनेक तरुणांनी बलिदान दिल्यानंतर मराठा आरक्षण मिळाले, मात्र कोर्टात ते टिकले नाही. मात्र, 2014 पासून 2020 पर्यंत ज्या तरुणांना मराठा आरक्षणातून निवड होती. त्या तरुणांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी आमची मागणी होती, असे विनोद पाटील म्हणाले आहेत. त्यात गेल्या सरकारने हा निर्णय घेतला नाही, तो घेऊ नये असेही काही लोक त्या सरकारमध्ये होते आणि यामुळे विषय लांबला. मात्र, या सरकारने निर्णय घेतला आहे. सुपर न्यूमररी पद्धतीने भरती करायचं ठरवलं आहे. त्याच स्वागत आहे. मात्र, यात सुद्धा अधिकाऱ्यांनी खोडा घातला असल्याचा आरोप पाटील यांनी केला. अधिकारी खरे आकडे पाठवत नाही म्हणून लाभार्थी कमी झाले, असाही आरोप करीत अधिकाऱ्यांनो अंत पाहू नका पात्र विद्यार्थ्यांची खरी यादी पाठवा, असे आवाहन विनोद पाटील यांनी केले आहे.
तात्काळ सरकारने न्यायालयाचे स्टॅण्ड घ्यावे. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घ्यावी. मराठा आरक्षणाला विरोध करायला बरेच जण गेले. पण, आता विरोध करू नका, आमचा संयम सुटला आहे. आमचा अंत पाहू नका. आता दबाव म्हणा, विनंती म्हणा, हे सरकारवर आहे, असा इशाराही त्यांनी शिंदे सरकारला दिला आहे.
कुणीही राजकारण करू नये किंवा खतपाणी घालू नका. सगळ्यांना माहित आहे हे कोण करतेय. मागील सरकारने मराठा समाजाचा तिरस्कार केला. या मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना आरक्षण मिळून देण्यास सहकार्य करावे. आम्हाला टाईम बॉण्ड प्रोग्रॅम हवा आहे. जे आम्हाला द्यायचं आहे ते विशेष कालमर्यादेत द्या, अशीही मागणी विनोद पाटील यांनी केली आहे.
राजे कुठल्याही नेतृत्वापेक्षा मोठे आहेत, असे विनोद पाटील म्हणाले काही लोकांनी राजेंचं नेतृत्व मान्य नाही, असं म्हटलं होतं. त्यावर विनोद पाटलांनी हे उत्तर दिलं. राजेंना नेतृत्वाची गरज नाही राजांचा मान मोठा आहे. छत्रपती संभाजी राजे यांची राजकीय भूमिका स्वराज संघटनेच्या माध्यमातून मांडत असेल. मी त्यांच्या संघटनेचा प्रवक्ता नाही, त्यांची राजकीय भूमिका त्यांना विचारावी, असेही पाटील यांनी म्हंटले आहे. मराठा क्रांती मोर्चा फोडणारा आणखी कोणता माईका लाल जन्माला आला नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.