कर्नाटक सरकार ऐकत नसेल तर वादग्रस्त सीमा भाग केंद्रशासित करा : विनायक राऊत
सूरज दहाट | अमरावती : महाविकास आघाडीच्या खासदारांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्वीट करत महाराष्ट्राला डिचवलं आहे. यावरुन आता विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. खासदार विनायक राऊत यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र सोडले आहे. तसेच, कर्नाटक सरकार ऐकत नसेल तर वादीत भाग केंद्रशासित करावा, असे त्यांनी म्हंटले आहे. ते सध्या अमरावती जिल्हा दौऱ्यावर आहेत.
विनायक राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आता ताठ मान राहली नाही. त्यांनी तोंडाला शर्मिंदापणाची पट्टी लावली आहे. ते भाजपची लाचारी करीत आहे म्हणून ते कर्नाटकच्या विरोधात चकार शब्द काढत नाही, असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी शिंदे यांच्यावर केला आहे.
मविआच्या खासदारांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्वीट करत महाराष्ट्राला डिचवलं. यावर विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, कर्नाटकचे मुख्यमंत्री अत्यंत मग्रूर आणि मुजोर आहे. त्यांनी अमित शहा यांच्या वक्तव्याला सुद्धा केराची टोपली दाखवली. यात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यस्थी करावी. कर्नाटक सरकार ऐकत नसेल तर वादीत भाग केंद्रशासित करावा, असे त्यांनी म्हंटले आहे.
शिवसेना पक्षाबद्दल वाद न्यायालयात प्रलंबित आहे. यावर सुद्धा विनायक राऊत यांनी भाष्य केलं. न्यायालय व निवडणूक आयोगाकडे शिवसेनेची भूमिका मजबूत आहे. निवडणूक आयोग यात पक्षपातीपणा करीत आहे. तर या विरोधात एक दिवस पत्रकार परिषद घेऊन पक्षपातीपणा उघड करू की शिंदे गटाला फेवर असं काम निवडणूक आयोग व न्यायलय करीत आहे, असा आरोप देखील खासदार विनायक राऊत यांनी केला.
दरम्यान, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोशल मिडियावर ट्विट करुन थेट अमित शहांना आव्हान दिलं आहे. बोम्मई म्हणाले की, महाराष्ट्रातील शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने काही फरक पडणार नाही. महाराष्ट्राने याआधीही असे प्रयत्न केले आहेत. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. सुप्रीम कोर्टात आमची बाजू भक्कम आहे. सीमावादावर आमचं सरकार कोणतीही तडजोड करणार नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.