विनायक मेटे यांच्यावर पार्थिवावर उद्या होणार अंत्यसंस्कार
मुंबई : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे आज अपघाती निधन झालं आहे. त्यांच्या निधनावर राजकीय विश्वातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. एक तडफदार नेतृत्व आपल्या मधून निघून गेले, अशी प्रतिक्रिया शिवसंग्राम संघटनेचे मुंबई अध्यक्ष दिलीप माने यांनी दिली आहे. तर, उद्या विनायक मेटे यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहितीही माने यांनी दिली.
दिलीप माने म्हणाले की, एक तडफदार नेतृत्व आपल्यामधून निघून गेले. आपण सर्वांनी पाहिले की राजकारण्यापेक्षा सुद्धा समाजकारणाला त्यांनी प्राधान्य दिलं आणि गेले 25 वर्ष विधान परिषदेमध्ये आणि रस्त्यावर सुद्धा त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा दिला. पण, काळानं दुर्दैवाने सकाळी त्यांचा आज अपघातामध्ये निधन झालं.
त्यांना आता पोस्टमार्टमसाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, इंजेक्शन देण्यासाठी हॉस्पिटलमध्ये व्यवस्था नव्हती म्हणून मेटेंना जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले आहे. अर्ध्या तासांमध्ये मेटेंचे पार्थिव घरी आणले जाईल आणि साधारणतः दोन ते चार वाजेपर्यंत दर्शनासाठी कार्यकर्त्यांना आणि त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व बांधवांसाठी उपलब्ध असेल. त्यानंतर चार वाजता बाय रोड ॲम्बुलन्समध्ये बीडमध्ये विनायक मेटे यांचे पार्थिव पाठवलेलं जाईल आणि उद्या दुपारी चार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती माने यांनी दिली.
विनायक मेटे यांच्यावर प्रेम करणारी बरीचशी मंडळी आहेत. रस्त्यामध्ये लोक आल्यानंतर थांबले तर ते नक्कीच त्यांना अंत्यदर्शनासाठी थांबवलं जाईल. कारण त्यांचा जो चाहता वर्ग आहे तो मोठा वर्ग आहे. आता अंत्यदर्शनासाठी उद्धव ठाकरे येथे येणार असल्यांचेही दिलीप माने यांनी सांगितले.