मविआचे मंत्री अडीच वर्ष काय भजे तळत होते का? विखे पाटीलांची खोचक टीका
राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना सत्ताधारी आणि विरोधकांमधील वाद चिघळतच चालला आहे. त्यातच आता भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. काही झाल तर केंद्राकडे बोट दाखवलं जात होतं. मग मविआचे मंत्री काय करत होते भजे तळत होते का? असे म्हणत त्यांनी विरोधकांना धारेवर धरलं.
विखे पाटील म्हणाले की, किमान समान कार्यक्रमात फक्त वसुलीच झाली बाकी काहीच झाले नाही. या सरकारने मराठा समाजाचे आरक्षण घालवले, ओबीसीचे राजकीय आरक्षणही घालवले. महाराष्ट्राने एवढं भ्रष्टाचारी सरकार कधी पाहिलं नव्हतं असा घणाघात त्यांनी बोलताना केला. पुढे बोलताना ते म्हटलं की, अडीच वर्षात काहीही झालं तरी महाविकास आघाडी सरकारकडून केंद्राकडे बोट दाखवलं जात होतं. मग मविआचे मंत्री काय करत होते भजे तळत होते का? असा खोचक टोला देखील यावेळी लगावला आहे. सोबतच संगमनेर तालुक्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था भाजपच जिंकेल असा विश्वास देखील व्यक्त केला.
उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरांतावर टीका
माझे कुटुंब तूमची जबाबदारी म्हणत विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. तसेच निळवंडे धरणाचं श्रेय हे देवेंद्र फडणवीस यांचंच आहे. त्याचे श्रेय दुसरे कोणीही घेण्याचा प्रयत्न करू नये. उजवा आणि डाव्या कालव्यात पाणी आणल्याशिवाय राहणार नाही म्हणत त्यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना देखील धारेवर धरले आहे. पूर्वी आपण पारंतत्र्यात होतो अशी तालुक्यातील जनतेची भावना झाली होती. मात्र आता जनतेला स्वातंत्र्य मिळाल्या सारखे वाटत आहे असे मत विखे पाटील यांनी बोलताना व्यक्त केले आहे.