'महाराष्ट्रात भाजपच पानिपत झाल्याशिवाय राहणार नाही'
कल्पना नलसकर | नागपूर : राजाचा आवडता पोपट जसा मेला तस उद्धव जी यांना पोपट मेला असं कुणी सांगतच नाहीय. उध्दव ठाकरेंची शिवसेना ही शिल्लक सेना आहे, असे टीकास्त्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडले आहे. यावर कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस उद्धव ठाकरे यांच्यावर बोलले. पण, महविकास आघाडीचा पोपट मेला नाही. भाजपच्या सत्तेची चिमणी भुर्रर्र उडून जाईल, असा निशाणा वडेट्टीवारांनी फडणवीसांवर साधला आहे.
शरद पवार यांच्या घरी महविकास आघाडीच्या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली आहे. हायकामंड आदेशानुसार महविकास आघाडीसोबत जाण्याचे संकेत दिल्यानं त्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष उपस्थित होते. जागा वाटपासंदर्भात सोनिया गांधी, राष्ट्रीय कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी हे नेते ठरवून जागा वाटपाचा सूत्र ठरेल, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
कोणी किती आणि कुठं जागा लढवणार याला काही अर्थ नाही. महविकास आघाडी म्हणूनचा आम्ही समोर जाऊ. महाराष्ट्रात भाजपच पानिपत झाल्याशिवाय राहणार नाही. कर्नाटकपेक्षा वाईट अवस्था भाजपची महाराष्ट्रात होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
संजय राऊत काय म्हणाले माहित नाही किंवा त्यांनी म्हटलं म्हणून निर्णय झाला असे नाही. तिन्ही पक्षाचे ज्येष्ठ नेते बसून जागा वाटपासंदर्भात चर्चा होईल. महविकास आघाडी म्हणून निवडणुकीला जाऊ. महाविकास आघाडी होऊ नये यासाठी भाजप मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत आहे. मीठ विरघळून जाईल, असेही वडेट्टीवारांनी म्हंटले आहे.
दरम्यान, संजय राऊतांनी लोकसभा निवडणुकीवरुन भाष्य केलं आहे. आगामी लोकसभेत शिवसेना ठाकरे गटाचे १९ खासदार लोकसभेत दिसतील. महाविकास आघाडीत निवडणुकीचा कोणताही फॉर्मूला अजून ठरलेला नाही. २०१९ मध्ये महाराष्ट्रात जिंकलेल्या १८ जागा शिवसेनेकडे राहणार आहे. लोकसभेच्या जिंकलेल्या सर्व १८ जागा लढवणार आणि जिंकणार, अशा विश्वास राऊतांनी व्यक्त केला.