परीक्षार्थींनी दिवे लावू नये म्हणून Phdचा पेपर फोडण्याचे कारस्थान केले का; वडेट्टीवारांचा टोला
मुंबई : महाज्योतीच्या पीएचडी फेलोशिपचा जानेवारीमध्ये परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र प्रश्नापत्रिका आधीच फुटल्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला आहे. पुणे आणि नागपूर या दोन विभागांमध्ये ही बाब उघडकीस आली आहे. महाज्योती पीएचडी फेलोशिपच्या पेपरमधील 4 पैकी 2 सेटला सील नसल्याने हा पेपर लीक आसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. यावरुन आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे
विजय वडेट्टीवार म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विचारले होते पीएचडी करून दिवे लावणार का? प्रामाणिक परीक्षार्थींनी दिवे लावू नये म्हणून थेट आज पीएचडी फेलोशीपचा पेपर फोडण्याचे कारस्थान केले का, असा थेट सवाल त्यांनी केला आहे.
पुणे, नागपूर इथे पेपरफुटीची घटना समोर आली आहे. एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री असलेलं महायुती सरकार काय काय दिवे लावत आहे हे महाराष्ट्रातील जनता आणि युवा बघत आहे. ही परीक्षा दोन वेळा घेतली आणि दोन्ही वेळा घोळ घालण्यात आला आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
आरोपींवर कारवाईची मागणी केली तर गृहमंत्री साहेब पुरावे आणून द्या म्हणतात. तलाठी परीक्षेच्या निकालावर प्रश्न उपस्थित केले तर महसूल मंत्री कारवाईची धमकी देतात! आता यावेळी कारवाई करा, परीक्षार्थींना धमकी देऊ नका, असा टोलाही वडेट्टीवारांनी फडणवीसांना लगावला आहे.
दरम्यान, बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून पीएचडी. फेलोशिपसाठी आज राज्यातील 4 प्रमुख केंद्रांवर पात्रता परीक्षा घेण्यात आली. यातील पुणे आणि नागपूर या परीक्षा केंद्रांवर महाज्योती पीएचडी फेलोशिप परीक्षेचा पेपर पुन्हा फुटल्याने समोर आले आहे. चार सेट पैकी 2 सेट C आणि D हे लीक असून ते झेरॉक्स कॉपी असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला आहे. तर, शासनाने सर्व विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्यावी, अशी मागणी आता विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.