सरकारने तिजोरीकडे बोट दाखवून हात वर करू नये; वडेट्टीवारांचे टीकास्त्र
मुंबई : राज्यात अवकाळी पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. यावरुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. सरकारने तिजोरीकडे बोट दाखवून हात वर करू नये. आता सरकारने अधिवेशनाची वाट पाहू नये, असे त्यांनी म्हंटले आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, सरकारचे अलीकडे सर्व अंदाज चुकत आहेत. अवकाळी पावसाचा हवामान खात्याने अंदाज दिल्यावर सरकारने काय उपाय योजना केल्या आहेत ते बघावे. रब्बी हंगामातील, तसेच फळ बागा यांचे नुकसान झाले आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांचे सुद्धा नुकसान झाले आहे. एकीकडे आजपर्यंत दुष्काळ परिस्थिती होती तीच आज अवकाळी पाऊस झाला आहे. यापूर्वी 1 हजार मंडळ हे मदतीपासून वंचित राहणार आहेत. आता तातडीने मदतीची गरज असताना सरकार फक्त आता पंचनामे म्हणत आहेत.
केंद्र सरकारकडून 2500 कोटी रुपये यांची मदत मिळेल अशा प्रकारचे खोटे आश्वासन शेतकऱ्यांना देत आहे. 50 हजार रुपये सुद्धा कर्ज माफीचे दिले नाहीत. केंद्र सरकारकडून आता मदत मिळू शकतं नाही. पीक विम्याचे शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळाले नाहीत. सरकारने तिजोरीकडे बोट दाखवून हात वर करू नये. आता सरकारने अधिवेशनाची वाट पाहू नये, असे त्यांनी म्हंटले आहे.
मराठवाड्यातील धरणात पाणी नाही. त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. जलयुक्त शिवार या योजेनेचा फायदा झाला नाही. आमची सत्ता असताना शेतकऱ्यांना मदत केली होती. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 25 हजार रुपये पर हेक्टर आणि 5 हेक्टरपर्यंत मदत दिली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, छगन भुजबळांनी शिंदे समिती बरखास्त करण्याची मागणी केली आहे. याबाबत बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, शिंदे समितीची गरज होती का नाही हे भुजबळ यांनी कॅबिनेट मध्ये का सांगितले नाही? काय चालू आहे या राज्यात कळत नाही. आता फायली अडवा आणि एकमेकांची जिरवा अशी नवी सुरुवात झाली आहे, असा निशाणा त्यांनी साधला आहे.