अजित दादा दिल्लीला जाऊन रडले; कोण म्हणालं असं?
मुंबई : महायुतीत सामील झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत अजित पवारांनी निधी वाटपावरुन आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवल्याचंही समजत आहेत. याच पार्श्वभूमीवर विरोधी वडेट्टीवार यांनी अजित पवारांवर टीकास्त्र डागले आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, अजित दादा कधी खुश राहिले, ते नेहमीच नाराज असतात. मनाप्रमाणे झाले तर खुश.. मनाविरुद्ध झाले तर नाराज. हम करे सो कायदा, आम्ही तसे वागू अशी त्यांची भूमिका आहे. तीन पक्षाच्या सरकारमध्ये त्यांना वाटते निधी मिळत नाही, अरे तिजोरीची चावी तुमच्याकडे आहे, तरी निधीसाठी का रडता. आता तुमची धमक दाखवा.
महाविकास आघाडीमध्ये धाक दाखवून सर्व तिजोरी साफ करत होता. तीच धमक आता दादांनी दाखवावी. निधी मिळत नाही, म्हणून रडण्यापेक्षा दुसऱ्याला रडवण्याची हिंमत आहे का? हे दादांनी आता दाखवावे. संजय राऊत म्हणतात त्या प्रमाणे ते दिल्लीचे चरणदास झाले आहे. आता ते दादागिरी दाखवू शकत नाही, असा टोला त्यांनी अजित पवारांना लगावला आहे.
दिल्लीत त्यांनी तक्रारच केली. आता असं सांगू नका की तक्रार करता करता ते तिथे रडले सुद्धा. तक्रारी पुरताच दादांना मर्यादित ठेवा, आता रडण्याची स्थिती अजित पवारांवर आली असेल, कारण भारतीय जनता पक्षामध्ये जाणाऱ्यांना रडवून रडवून सोडवतात. त्यामुळे सडण्याची आणि रडण्याची वेळ अजित पवारांवर आली असावी, असेही वडेट्टीवार म्हंटले आहेत.
पुढच्या वेळेस अजित पवारांना भाजपच्या तिकिटावरच लढावं लागेल, असं मला एकंदरीत दिसते आहे. कमळावर लढल्याशिवाय त्यांना पर्याय नाही. मी पूर्णपणे खात्रीने सांगू शकतो अजित पवार गटाला कमळाबाईचा आशीर्वाद असेच होणार, अशीही टीका त्यांनी केली आहे.