महाराष्ट्राच्या जीवावर आज गुजरात पोसला जातोय; वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात
मुंबई : गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी आज एक दिवसीय भेटीदरम्यान व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट 2024 च्या संदर्भात मुंबईतील आघाडीच्या उद्योगांशी संवाद साधला. यावरुन आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. मराठी तरुणांच्या तोंडाचा घास काढून घेण्याचे उद्योग सुरू असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.
फॉक्सकॉन प्रकल्प पळवून गुजरातचे पोट भरले नाही आणि हा प्रकल्प गुजरातला देऊन महायुती सरकारचे खोके भरले नाही असं दिसतंय. गुजरातचे मुख्यमंत्री आज महाराष्ट्रात मुंबईत येऊन येथील उद्योग नेण्यासाठी "व्हायब्रंट गुजरात" नावाने रोड शो करतायत आणि राज्याचे संपूर्ण मंत्रिमंडळ रेड कार्पेट टाकून त्यांचे स्वागत करत आहे.
सरकारी नोकरीत कंत्राटी भरती करा, उद्योग गुजरातला पाठवून खाजगी कंपन्यांमधील नोकऱ्या संपवा. हे उद्योग या सरकारचे सुरू आहे. राज्यातील तरुणांच्या तोंडाचा घास काढून घेण्याचे पाप महायुती सरकार करत आहे, असा घणाघात विजय वडेट्टीवारांनी केला आहे.
महायुतीचे ट्रीपल इंजिन हे महाराष्ट्रात विकास कामे इम्पोर्ट करण्यासाठी नाही तर दिल्लीमार्गे येथील उद्योग गुजरातला एक्सपोर्ट करण्यासाठी लावण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या जीवावर आज गुजरात पोसला जातोय, असा जोरदार हल्लाबोल वडेट्टीवारांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे.