Vidhan parishad : शिंदे गट आणि भाजपमध्ये धुसफुस? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
कल्पना नळस्कर | नागपूर : शिक्षक मतदार संघाच्या उमेदवारीवरुन भाजप आणि शिंदे गटात नाराजी असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. यावर आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वात शिवसेना-भाजपची युती केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वात शिवसेना-भाजपची युती केलेली आहे. नागपूरची शिक्षक मतदार संघाची निवडणूक शिक्षक परिषद लढत असून नेहमीप्रमाणे भारतीय जनता पक्षाला समर्थन मागितलेला आहे. त्या संदर्भात आज निर्णय होईल. शिक्षक परिषदेने जे उमेदवार दिले आहेत त्याला भाजप समर्थन देण्याचा निर्णय आहे, तेवढाच बाकी आहे.
नाशिकच्या उमेदवारीबद्दल अद्याप निर्णय झालेला नाही. शिक्षक परिषदेची नागपूर आहे. कोकणात(शिंदे-फडणवीस) दोघांनी मिळूनच उमेदवार दिला आहे. मराठवाडा सुद्धा भाजप सेना युतीतूनच उमेदवार दिला आहे आणि त्याला भाजपच्या केंद्रीय पक्ष नेतृत्वाची मान्यता मिळाली, अशी माहिती त्यांनी दिली आहे. रंजीत पाटील आमचे उमेदवार आणि ते शंभर टक्के निवडून येतील. शक्तिप्रदर्शन हे फॉर्म भरताना होतच असतं मोठ्या प्रमाणात लोक येत असतात, असेही बावनकुळेंनी म्हंटले आहे.
सध्याचे वातावरण पाहता काँग्रेस स्वबळावर निवडून येऊ शकते, अशी महाराष्ट्रात परिस्थिती असल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. यावरुन चंद्रशेखर बावनकुळे यांनी पटोलेंवर निशाणा साधला आहे. काँग्रेस पार्टी स्वबळावर तयार असेल तर त्यांनी लढावं. त्यांचा अभिनंदन नाही त्यांनी लढावं, सत्तेत कोण येईल हे 2024 मध्ये जनता ठरवेल. उंटावर बसून शेळ्या हाकण्यासारखा हा काँग्रेसचा प्रकार आहे. ज्या पक्षातील काँग्रेसच्या नेत्यांना असुरक्षित वाटत असेल तर मग पक्षाचा काय त्यांच्या पक्षाला आणि त्यांना शुभेच्छा आहे, असा टोला चंद्रशेखर बावनकुळेंनी लगावला आहे.