सुनावणी दरम्यान ठाकरे गट अन् शिंदे गटात शाब्दिक चकमक, निवडणूक आयुक्तांनी केली मध्यस्थी
राज्यातील सर्वात मोठी सुनावणी आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरु आहे. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर सेनेत दोन गट पडले. या दोन्ही गटाकडून शिवसेना चिन्ह आणि पक्षावर दावा करण्यात आला. या वादात निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह तात्पुरतं गोठवलं आणि दोन्ही गटांना स्वतंत्र चिन्हे दिले. परंतु, आता शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कोणाचा यावरच आता आज सुनावणी सुरु आहे. मात्र, याच सुनावणी दरम्यान ठाकरे गटाचा युक्तीवाद सुरु असताना शिंदे गटाच्या वकिलांनी काही मुद्यांवर आक्षेप घेतला. त्यामुळे दोन्ही गटामध्ये मोठा वाद झाला.
काय घडलं नेमकं?
ठाकरे गटाची घटना निवडणूक आयोगाकडे आहे. यामध्ये प्रतिनिधी सभेचा उल्लेख आहे. परंतु, शिंदे गटाची घटनाच निवडणूक आयोगात नाही. यामुळे शिंदे गटाची प्रतिनिधी सभाच बेकायदेशीर आहे. प्रतिनिधी सभा ही अंतिम निर्णय घेऊ शकते. यामुळे शिंदे गटाला कोणाताही अधिकार न देता प्रतिनिधी सभेला परवानगी द्या, अशी मागणी देवदत्त कामत यांनी केली आहे. अशातच, शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी आक्षेप नोंदविला असून प्रतिनिधी सभा ही तुमचीच कशी असू शकते. प्रतिनिधी सभा ही फक्त तुमच्याचकडे कशी होऊ शकते? शिंदे गटाचे मुख्य वकील महेश जेठमलानी यांचा सवाल केला. त्यामुळे महेश जेठमलानी आणि देवदत्त कामत यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला. केंद्रीय निवडणूक आयोगातच दोन्ही मोठ्या वकिलांमध्ये वाद झाला. त्यामुळे वादात निवडणूक आयुक्तांनी मध्यस्थी केली.