रावणाचा वध दसऱ्याच्या आदल्या दिवशी करा, शिंदे सरकारची नवीन परंपरा; कुणी केली टीका?
मुंबई : दसरा मेळाव्यानिमित्त शिंदे गट आणि ठाकरे गट पुन्हा एकदा आमने-सामने येणार होते. मात्र, शिंदे गटाने एक पाऊल मागे घेत शिवाजी पार्कचा अर्ज माघारी घेतला. यानंतर आता शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होणार आहे. मात्र, याला कॉंग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी आक्षेप घेतला आहे. दसऱ्यानिमित्त होत असलेली आझाद मैदानावरील 48 वर्षाची रामलीलाची परंपरा मोडीत काढू नका, असे त्यांनी म्हंटले आहे.
मागील 48 वर्षांपासून दसऱ्यानिमित्त आझाद मैदानावर रामलीलाचे आयोजन करण्यात येत असते. महाराष्ट्र रामलीला मंडळ व साहित्य कला मंडळ यांनी रितसर अर्ज करून 15 ते 24 ऑक्टोबरपर्यंत आझाद मैदानाची परवानगी घेतली आहे. परंतु, या मैदानावर आता शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडणार आहे. त्यामुळे रावणाचा वध दसऱ्याच्या दिवशी न करता आदल्या दिवशी करा किंवा इतर ठिकाणी करा, अशी नवीन परंपरा शिंदे सरकार यांनी आणली आहे, अशी टीका वर्षा गायकवाड यांनी केली.
हा मराठी माणसाशी खेळ आहे. या ठिकाणी परराज्यातून अनेक लोक येतात. 48 वर्षाची ही रामलीला परंपरा यावर्षी मोडीत निघत आहे. त्यामुळे, स्वतःची राजकिय पोळी भाजण्यासाठी हे सर्व चालू आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.
दरम्यान, शिवाजी पार्कवर कुणाचा दसरा मेळावा होणार याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. दसरा मेळावा घेण्यास अखेर ठाकरे गटाला मुंबई महापालिकेने परवानगी दिली आहे. शिंदे गटानेही परवानगीसाठी पत्र दिले होते, परंतु त्यांनी ते पत्र मागे घेतले. त्यामुळं ठाकरे गटाचा मार्ग मोकळा झाला आहे. तर, आता शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होणार आहे.