सुषमा अंधारेंवर विभक्त पतीकडून गंभीर आरोप; सभेसाठी 50 लाख रुपये जमा केले
विकास माने | बीड : सुषमा अंधारे आमच्या पदाधिकाऱ्यांकडून पैसे मागत आहेत. म्हणून मी त्यांना दोन चापट्या लगावल्या, असा बीडमधील ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष अप्पा जाधव यांनी आरोप केल्यानंतर आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे, मात्र, सुषमा अंधारेंनी पत्रकार परिषद घेत हे आरोप फेटाळून लावले आहेत. अशात, आता अंधारेंचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप करत सभा उधळण्याचा इशारा दिला आहे.
सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनी त्यांच्यासह ठाकरे गटावर गंभीर आरोप केले आहेत. उद्या होणाऱ्या सभेसाठी विविध ठिकाणाहून पैसे गोळा करण्यात आले. आणि यावरूनच अंधारे आणि शिवसैनिकांमध्ये वाद झाला. एकट्या बीड जिल्ह्यातून या सभेसाठी 50 लाख रुपये जमा केल्याचं देखील वाघमारे यांनी म्हंटले आहे.
पैशांचा दुरुपयोग केला म्हणून जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारेंना मारहाण केली. या पैशातून अंधारे यांनी स्वतःचं घर भरलं आहे. मात्र उद्या होणाऱ्या सभेआधी कर्मचाऱ्यांकडून घेतलेले पैसे परत नाही केले तर मात्र सभा उधळून लावू, असा इशाराही वाघमारेंकडून देण्यात आला आहे.
काय म्हणाले होते अप्पा जाधव?
सुषमाताई अंधारे आमच्या पदाधिकाऱ्यांकडून त्या पैसे मागत आहेत. आपल्या कार्यलयात एसी, फर्निचर आणि सोफा बसवण्यासाठी त्या पदाधिकाऱ्याकडून पैसे घेत आहेत. माझ्या लेकरा-बाळाच्या मुखातील पैसे खर्च करून मी पक्ष वाढवत आहे. याकडे सुषमा अंधारेंचं लक्ष नाही. त्यामुळे सुषमा अंधारेंचा आणि माझा वाद झाला. या वादात मी सुषमा अंधारेंना दोन चापट्या लगावल्या. सुषमाताई अंधारे सध्या जिल्ह्यामध्ये खूप दादागिरी करत आहेत. त्या माझंही पद विकत आहेत. मी पक्ष वाढवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत आहे. रक्ताचं पाणी करत आहे. असे ते म्हणाले. मात्र असे काही नसल्याचे सुषमा अंधारेंनी स्पष्ट केलं आहे.