वैभव नाईक शिंदेच्या शिवसेनेत यायला तयार होते; निलेश राणेंचा मोठा दावा
प्रसाद पाताडे | सिंधुदुर्ग : ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची काहीच दिवसांपुर्वी सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख पदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. यामुळे वैभव नाईक नाराज असून शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. परंतु, त्यांनी या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. परंतु भाजप आमदार निलेश राणे यांनी वैभव नाईक यांच्याबद्दल मोठा दावा केला आहे. मागील काही काळामध्ये आमदार वैभव नाईक शिंदेंच्या शिवसेनेत यायला तयार होते. परंतु, एका अटीमुळे प्रवेश लांबणीवर पडला, असे निलेश राणेंनी म्हंटले आहे.
काय म्हणाले निलेश राणे?
मागील काही काळामध्ये आमदार वैभव नाईक शिवसेनेत यायला तयार होते. परंतु, राणे जर कुडाळ मालवण मधून लढणार नसतील व मलाच कुडाळ मालवणमधून तिकीट मिळणार असेल. तर मी शिवसेनेत यायला तयार आहे, असा शब्द आमदार वैभव नाईक यांनी दिला होता. हे खरं नसेल तर मी कोणत्याही मंदिरात यायला तयार आहे. वैभव नाईक यांनी देवावर हात ठेवून सांगावे ही चर्चा झाली की नाही, असे आवाहनच निलेश राणेंनी दिले आहे.
ते पुढे म्हणाले, नाईक तुम्ही शिंदे साहेबांकडे किती वेळा जाऊन काय काय बोललात? किती कामे करून घेतली? कधी कुठे कुठे कसे भेटलात? हे सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे वैभव नाईकांनी निष्ठेच्या वार्ता करू नयेत. वैभव नाईक यांच्या निष्ठेचा दाखला त्यांच्या घरचेही देऊ शकत नाही, अशी टीकाही निलेश राणेंनी केले आहे.
वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आपली कामे कशी करून घेतली. असे असताना मी उद्धव ठाकरे यांचा निष्ठावंत कार्यकर्ता असल्याचं सांगतात. मात्र, स्वतःच राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी व मी आमदार राहिलो पाहिजे या गणितामुळे त्यांचा पक्षप्रवेश लांबणीवर पडला आहे. त्यांना उद्धव ठाकरेंशी काही देणंघेणं नाही, असा दावाही निलेश राणे यांनी केला आहे.