शिवसेना संपलीये, उरलेले चार आमदार माझ्या संपर्कात; राणेंचा मोठा दावा
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर आज शरसंधान साधले. उद्धव ठाकरे गट आता कुठे राहिला? शिवसेना संपलीये ना! ५६ वरुन सहा-सात वर आहेत. त्यातीलही चार आमदार माझ्या संपर्कात आहेत, असा खळबळजनक दावा राणेंनी केला आहे. यामुळे राकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
नारायण राणे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी तरुण-तरुणी यांना नोकरी उपलब्ध व्हाव्या यासाठी प्रयत्न करत होते. त्यातील १० लाख नोकऱ्या पहिला टप्पा केला. शासनाच्या विविध विभागात नोकऱ्या दिल्या आहेत. पंतप्रधानांनी चांगले काम केले आहे. ७५ हजार नोकऱ्या दिल्या. ज्यांना नोकऱ्या मिळाल्या. त्यांना आनंद आहे. कोणी राजकारण करत असेल तर दिवाळी निमित्त काही बोलणार नाही.
आनंद शिधा वाटपास विलंब होत असल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. याबाबत विचारले असता नारायण राणे म्हणाले, शिधा वाटपाला काहीही उशीर झालेला नाही. फोटो लावला तर काय बिघडलं. एवढं त्रास होत असेल तर कागद लावून पाकीट फोडा. फोटोमुळे आक्षेप घेणं ही संकुचित वृत्ती झाली. काही उशीर झाला नाही. हे राजकारण सुरु आहे. आता काही हातात राहील नाही घर बसल्या-बसल्या षडयंत्र करत रहायचं एकच काम आहे, असा अप्रत्यक्ष टोलाही राणेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
शिवाजी पार्कवर मनसे आयोजित दीपोत्सावानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच स्टेजवर आले होते. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत नविन युती पाहायला मिळाणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर बोलताना नारायण राणे यांनी मीडियाची दृष्टी ज्या दिशेने जाईल त्या दृष्टीने घ्यायचं, असे सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
भास्कर जाधव यांनी केलेल्या मिमिक्रीवर नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मीटिंग घेतली म्हणजे बालेकिल्ला झाला असं नाही. सांगून घ्यावी ना. मी पणं मिमिक्री करु शकतो. पणं, याला टिंगल म्हणातात कोणाची टिंगल मस्करी करणे हे चांगले गुण नाहीत, असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच, भास्कर जाधव यांच्यावरच्या हल्ल्याची मला काही माहिती नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.
राजकारणाचा स्तर अजिबात घसरत चालला नाही. जे बोलतात त्यांचा थर खालावला आहे. राज्य सरकारचा नाही आणि महाराष्ट्रातील राजकारणाचाही नाही. ती माणसे कोणत्या पक्षाची आहेत त्यांची वैचारिक पातळी तपासली पाहिजे. हा छत्रपती शिवाजी महाराजाचा महाराष्ट्र आहे. वैचारिक स्तर घसरु नये, अस मला वाटत, असा सल्लाही त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना दिला आहे.
उद्धव ठाकरे माझे सहकारी नव्हते. आणि उद्धव ठाकरे गट आता कुठे राहिला? शिवसेना संपलीये ना! ५६ वरुन सहा-सात वर आहेत. त्यातील ऑन द वे आहेत. कधीही तेही सहभागी होतील. माझ्या संपर्कात चार आमदार आहेत. उद्या सांगेल भेटा, असा दावा राणेंनी केला आहे.