निवडणुकीचा ‘महामार्ग’
लोकशाही न्यूज नेटवर्क
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. यावेळी नितीन गडकरी यांच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाला त्यांनी १ लाख १८ हजार १०१ कोटींचा निधी दिला आहे. यातील १,०८,२३० कोटी रुपये भांडवली गुंतवणुकीसाठी देण्यात आले आहेत.
मात्र, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाम या राज्यांसाठी केलेल्या घोषणांकडे सर्वांचे लक्ष वेधले. या वर्षात वरील चारही राज्यांमध्ये निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे या राज्यांसंदर्भात घोषणा झाल्यानंतर भाजपच्या खासदारांनी घोषणाबाजी केली. केरळ, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता नाही. येणाऱ्या काळात आसासमध्ये देखील एकहाती अंमल प्रस्थापित झाल्यास विस्थापितांचा 'अजेंडा' मार्गी लावण्यास भाजपाला यश येणार आहे. त्यामुळे मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपाने मोठी घोषणा केली आहे.
केंद्र सरकारने रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातर्फे तामिळनाडूतील नॅशनल हायवेसाठी १.०३ लाख कोटींचा भरीव निधी देण्याची घोषणा केली आहे. केरळमध्ये ११०० किलोमीटरच्या हायवेसाठी ६५ हजार कोटी दिले आहे. याचसोबत पश्चिम बंगालमधील राष्ट्रीय महामार्गासाठी २५ हजार कोटींचा निधी उपलब्ध केलाय. आणि आसामसाठी ३४ हजार कोटींची घोषणा केली आहे.
यावरून भाजपा येणाऱ्या काळात या राज्यांसाठी आणखी तरतुदी करण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची एकहाती सत्ता आहे. त्याला आव्हान देण्याचं काम भाजपच्या पहिल्या फळीतील नेते करत आहेत. यासाठी येत्या ७ फेब्रुवारीला मोदी पुन्हा पश्चिम बंगालचा दौरा करणार आहेत. यावेळी ते पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या कामांचे भूमिपूजन करणार आहेत. याप्र कल्पांची किंमत जवळपास ४ हजार ७४२ कोटी आहे. याआधी गृहमंत्री अमित शाह तसेच राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही बंगाल दौरे केले. त्यावेळी तृणमूलच्या समर्थकांचा रोष त्यांनी अनुभवला.
दक्षिणेच्या राजकारणात भाजपा अनेक वर्षांपासून पाय रोवण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, अद्याप त्यांना यश आलेलं नाही. तेलंगणात महापालिका निवडणुकांमार्फत भाजपाने एन्ट्री केली आहे. मात्र आंध्रमध्ये अद्याप वायएस जगमोहन रेड्डी यांचे सरकार आहे. तसेच कर्नाटकचा अपवाद वगळता केरळ आणि तामिळनाडूतही भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी मोठी लढाई लढावी लागणारे. त्यामुळे आता या राज्यांमधील जनतेला प्रलोभन देण्यासाठी मोठ्या घोषणा केल्याची चर्चा आहे.