जमीन दाखवण्याची भाषा करणाऱ्यांना अस्मान दाखवू, उद्धव ठाकरेंचे शाहांना जोरदार उत्तर
आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपसह सर्वच पक्षांनी चांगलीच कंबर कसली आहे. अशातच पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय गृहमंत्री भाजप नेते अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर होते. या दौऱ्या दरम्यान शहांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. याच टीकेनंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सोबतच शिंदे गटावरही त्यांनी जोरदार निशाणा साधला.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
अमित शाह यांच्या टीकेला उत्तर देतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, जमीन दाखवण्याची भाषा करणाऱ्यांना अस्मान दाखवू. त्यांना बोलायचं ते बोलू द्या. थोडक्यात काय तर संघर्षाचा काळ आहे. शिवसेना संपवायला निघाले आहे.आता वेळ आली आहे की उद्धव ठाकरेंना जागा दाखवली पाहिजे. निष्ठाही कितीही बोली लावली तरी विकली जाऊ शकत नाही. गद्दार लोकांपेक्षा मूठभर निष्ठावंत कधीही बरे आहे. असे बोलत त्यांनी शिंदे गटावर टीका केली.
माझ्यासोबत निष्ठावंत कडवट शिवसैनिक
पुढे बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्रीपद ही माझी खासगी मालमत्ता नाही. त्यांना मुख्यमंत्री पद हवं असतं तर मी क्षणभरात सोडल असते. माझ्याकडेआमदार होते तेव्हाही त्यांना डांबून ठेवलं असतं. माझी देखील ममता बॅनर्जीकडे ओळख होती त्या आमदारांना तिकडे घेऊन गेलो असतो. किमान कालीमातेच्या मंदिरात नेलं असतं, राजस्थानात त्यांना नेता आलं असत पण तो माझा स्वभाव नाही. त्यामुळे सर्वांना सांगितलं की, दरवाजा उघडा आहे. राहायचं असेल तर निष्ठेने राहा नसेल तर तिकडे जा. आता माझ्यासोबत सर्व निष्ठावंत कडवट शिवसैनिक आहेत. असे ते बोलताना म्हणाले.
दसरा मेळाव्यात सर्व काही बोलणार- उद्धव ठाकरे
शिवसेना नक्की कोणाची हा वाद कोर्टात असतानाच, शिंदे गट आणि शिवसेनेत दसरा मेळाव्यावरून वाद सुरु झाला आहे. दोन्ही गटाकडून जोरदार उत्तर- प्रत्युत्तर देणे सुरु होत. त्यावरच आता उद्धव ठाकरेंनी भाष्य केले आहे ते म्हणाले की, दसरा मेळावा शिवाजी पार्क येथेच घ्यायचा आहे. दसरा मेळाव्यात आज पर्यंत झालेलं सर्व काही बोललं. तेव्हा मुख्यमंत्री पदाचा मास्क असायचा बोलताना जपून बोलावं लागायचं आता तसं नाही आहे. असे उद्धव ठाकरेंनी बोलताना स्पष्ट केले.