पुनरावृत्ती! कारवर उभं राहून उद्धव ठाकरेंचे जोरदार भाषण; बाळासाहेबांची 'ती' आठवण झाली ताजी
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु असताना काल राज्यातील राजकारणात मोठी बातमी घडली. काल अचानक केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे ठाकरे गटासाठी मोठा धक्का आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज आक्रमक भूमिकेत बघायला मिळाले. त्यातच आज त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला आहे. गाडीत उभे राहून साधलेल्या या संवादातून त्यांनी थेट शिंदे गटाला आव्हान दिले आहे. परंतु, यावेळी बाळासाहेब ठाकरेंचा एक फोटो देखील व्हायरल होत आहे. या फोटोचा संबंध आता उद्धव ठाकरेंच्या भाषणासोबत जोडला जात आहे.
काय म्हणाले आज उद्धव ठाकरे?
"आमच्या शिवसेनेने ज्या प्रकारे चोराला आपले नाव दिले. त्यांनी आपले पवित्र धनुष्यबाण चोराला दिले. धनुष्यबाण चोरणारे मर्द असतील. तर धनुष्यबाण घेऊन या. मी मशाल घेऊन येतो. बघू काय होते. धनुष्यबाण पेलायला मर्द लागतो. रावणानेही शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला उताणा पडला. शिवाय शिवधनुष्य ओवाळताना हे चोर आणि दुकानदार खूश होणार नाहीत. असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, मी कुठेही थकलो नाही. कुठेही खचून जाणार नाही. तुम्ही माझी शक्ति आहात. मी तुझ्या बळावर उभा आहे. जोपर्यंत ही ताकद माझ्या पाठीशी आहे, तोपर्यंत कितीही चोर-दुकानदार आले तरी त्यांना गाडून छातीवर शिवरायांचा भगवा फडकवण्याची ताकद आमच्या मनगटात आहे. असा विश्वास उद्धव ठाकरेंनी यावेळी व्यक्त केला.
नेमका काय आहे तो फोटो?
उद्धव ठाकरेंनी आज कलानगर चौकात जीपवर उभे राहून भाषण केलं. याच आधी असेच चित्र ३० ऑक्टोबर 1968 साली दिसले होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दसरा मेळाव्याची परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी जीपच्या बोनेटवर उभं राहून शिवसैनिकांना संबोधित केले होते. मात्र, आज उद्धव ठाकरेंच्या भाषणावेळी तीच आठवण यावेळी शिवसैनिकांना पुन्हा झाली.