उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; म्हणाले, मध्यावधी निवडणूका लागणार, कामाला लागा...
राज्यात एकीकडे राजकीय घडामोडी घडत असताना, मागील काही दिवसांपासून राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होणार अशी शक्यता अनेक नेत्यांकडून वर्तवण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मध्यावधी निवडणूका लागू शकतात, त्यासाठी तयारीला लागा असे आदेश दिल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. आज झालेल्या दादर येथील संपर्कप्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी हे विधान केले आहे.
काय दिले उद्धव ठाकरेंनी आदेश?
दादर येथील शिवसेना भवनात राज्यातील सर्व संपर्कप्रमुखांच्या बैठक पार पडली. तयारीला लागा, मध्यावधी निवडणुका कधीही लागू शकतात,कार्यकर्त्यांपर्यंत जा.. असे आदेश बोलताना उद्धव ठाकरे यांनी संपर्कप्रमुखांना दिले आहेत. राज्यामध्ये राजकीय परिस्थिती अस्थिर झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याला प्रकल्प देण्याची घोषणा केली आहे. निवडणुका आल्यावरच अशा घोषणा केल्या जातात. त्यामुळे केंद्राकडून ही घोषणा करण्यात आली असून याचा अर्थ राज्यात निवडणुका लागू शकतात, असेही उद्धव ठाकरे यांनी विधानसभा संपर्क प्रमुखांना सांगितल्याचे समजते. राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका लागतील. आपल्याला प्रत्येकाच्या घराघरात पोहचला हवे. आपला मुख्यमंत्री असताना केलेले काम घराघरात पोहचवा. राज्यात मध्यवधी निवडणुका लागतील, त्याला तयार राहा, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी संपर्कप्रमुखांना दिल्या आहेत.
उद्धव ठाकरेंच्या या वक्त्यानंतर राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. सत्ताधारी पक्षाकडून यावर प्रतिक्रिया येत आहे. त्यावरच एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी यांनी उद्धव ठाकरे यांच्या या विधानावर उत्तरदिले आहे. शेलार म्हणाले की, आमदार फुटू नये म्हणून उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केले आहे. नेमकं कशाच्या आधारावर उद्धव ठाकरेंनी मध्यावधी निवडणुकीचं भाकित केलं? अशी प्रतिक्रिया यावेळी आशिष शेलार यांनी दिली आहे.