मी बारसूचं पत्र पंतप्रधानांना दिलं होतं; उध्दव ठाकरेंनी केले मान्य, पण...
मुंबई : कोकणातल्या रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधात आंदोलन सुरु आहे. यावरुन राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. परंतु, बारसू येथे प्रकल्प होण्यासाठी उध्दव ठाकरेंनीच पत्र दिल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला होता. यावर अखेर आज उध्दव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. मी पत्र दिलं होतं, पण तो प्रकल्प लोकांना दाखवा त्यांच्या मनातले संशय दूर करा हे मी बोललो होतो, असे उत्तर त्यांनी दिले आहे.
मी बारसूचं पत्र दिलं होतं. पण, अडीच वर्षात पोलिसांच्या बळावर मी तो प्रकल्प का राबवला नाही? पर्यावरणाला हानी करणारा प्रकल्प का हवा आहे? तुमचं शुद्धीकरणाचा कारखाना मोठा आहे, आणखी कशाला हवा आहे, असा टोला उध्दव ठाकरेंनी लगावला आहे.
नाणारच्या वेळेला मी बोललो होतो जिथे याचं स्वागत होते तिथे करा. बार्शीमध्ये बरीचशी जागा मोकळी आहे, पहिलं तिथे विचारा ती जागा चालते का? सरकार पाडण्याच्या नादात सगळं ओके आलं आणि पोलीस सगळ्यांच्या घरात घुसून केसेस टाकून, टाळकं फोडून सांगत आहेत, अशी टीका उध्दव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे. ती ग्रीन रिफायनरी आहे तर मग मारझोड कशाला करतात? असा सवाल त्यांनी केला.
पत्रात तो प्रकल्प लोकांना दाखवा. त्यांच्या मनातले संशय दूर करा. त्या लोकांना खरंच रोजगार हवायं. पण, कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने नाही तर कायमस्वरूपी मिळणार आहे का? हे सांगा असे मी बोललो होतो. प्रकल्पाबद्दल समज-गैरसमज लोकांपर्यंत पोहोचवा. जर लोकांना मंजूर असेल तर रिफायनरी करायची नाही हे सरकारचं धोरण असायला हवं. परंतु, तिथल्या माता-भगिनींना फरफटत नेत आहेत. आम्ही काही बोललो की विकासाच्या आड येतात. मात्र, पर्यटनाला उद्योगाचा दर्जा दिला तर कसं होईल? मी राज्याच्या मुळावर येणारे विषय अडवले म्हणून सरकार पाडलं. यापुढेही विषय आडवेल, असे त्यांनी म्हंटले आहे.
एखादा प्रकल्प झाल्यावर भूसंपादन करावं लागतं. समृद्धी महामार्गालाही विरोध होता. परंतु, तो सोडवण्यात आला. तसाच बारसूचा प्रश्न का नाही सोडवत आहेत? तिथल्या लोकांना सांगा रिफायनरी आल्यावर उत्पन्न दुप्पट होईल. हे सगळं तुम्ही लोकांना घेऊन दाखवलं पाहिजे पण हे सगळं काही करायचं नाही. सगळ्यांना चिरडून कोणाच्यातरी सुपाऱ्या घेऊन त्यांना प्रकरण दाबायचं आहे. जमीन आमची आणि इमली तुमचे हेच घडत आहे. नाणारमध्ये जे झालं तेच इथे होत आहे. जी काही भरपाई मिळणार आहे ती या दलालांना मिळणार आहे आणि दाखवायचा आहे की बघा सगळ्यांचा होकार आहे, असेही उध्दव ठाकरेंनी म्हंटले आहे.