न्यायदेवतेने विश्वास सार्थ ठरवला, पहिल्या न्यायालयीन विजयानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
राज्यात मागील काही दिवसांपासून राजकारण एकच खळबळ उडाली आहे, शिवसेना आणि शिंदे गटात दसरा मेळाव्याबाबत जोरदार वादंग पेटलेलं आहे, अशातच शिवतीर्थावर दसरा मेळावा कोण घेणार याबद्दल कोर्टाने निर्णय दिला आहे. शिंदे गटाला दणका देत कोर्टाने हा निर्णय शिवसेनेच्या बाजूने दिला आहे. यावरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
न्यायालयाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले की, 66 पासून आमचा विजया दशमीचा मेळावा होतो. न्यायदेवतेवर विश्वास आहे आणि तो सार्थ ठरवला आहे. माझ्या सर्व शिवसैनिकांना आवाहन, उत्साहाने, वाजत गाजत या, पण शिस्तीने या. आपल्या तेजस्वी परंपरेला, वारस्याला गालबोट लावू नका. इतर काय करतील त्याची कल्पना नाही, पण आपली परंपरा जपा. तेज्याच्या वारस्याला गालबोट लागेल असं कृत्य आपल्याकडून होऊ देऊ नका. दसरा मेळाव्याकडे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशासह जगभरातील मराठी माणसाचं लक्ष असतं. असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी शिवसैनिकांना केले.
पुढे ते म्हणाले की, शिवसेनेत दोन गट नाही, शिवसेना ही शिवसेनाच आहे. ती वाढली आहे. परवचा मेळावा हा मुंबईतल्या गटप्रमुखांचा होता. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कोर्टाने राज्य सरकारला बजावली आहे. त्यामुळे राज्य सरकारने कायदा सुव्यवस्था राखावी. प्रत्येकवेळी वाईटाचा विचार करु नये. चांगली सुरुवात झाली आहे. पहिला मेळावाही मला आठवतोय, आजोबांचे भाषण आजही माझ्याकडे आहे. कोरोनाचा काळ गेला तर ही परंपरा कायम आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना दिली.