Uddhav Thackeray : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींना भेटायला तयार
राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. मराठा आरक्षण आंदोलनला काही ठिकाणी हिंसक वळण लागलं. मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. राजकीय वर्तुळातून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठा आरक्षणाचा विषय चिघळलेला आहे. मराठा आरक्षणावर अजूनही मार्ग निघत नाही आहे. मी जरांगे पाटलांना विनंती करतो की, कृपा करुन तुम्ही टोकाचे पाऊन उचलू नका. राज्य जळत असताना उपमुख्यमंत्र्यांना दुसरं राज्य महत्वाचे. महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम सुरु आहे. मराठा समाजाला न्याय आणि हक्क मिळाला पाहिजे. मराठा समाज कुणाच्या ताटातलं घेणारा नाही. आरक्षणावर मार्ग काढा आम्ही तुमच्यासोबत. संसदेचे विशेष अधिवेशन घ्या. तोडगा काढा. राज्यात आणि केंद्रातही विशेष अधिवेशन घ्या.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडा. केंद्रात तोडगा निघत नसेल तर खासदारांनी राजीनामे द्यावे. शासन आपल्या दारी आणि पोलीस आपल्या घरी असं सुरु आहे. पंतप्रधान मोदींसमोर मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडा. परिस्थीती हाताबाहेर गेली आहे. मराठा आरक्षणाचा विषय लोकसभेत सोडवता येईल. काहीही करा आरक्षण सोडवा. मला आताही पंतप्रधान मोदींना भेटायला काही अडचण नाही आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर पंतप्रधान मोदींना भेटायला तयार आहे. असे उद्धव ठाकरे म्हणाले.