Kirit Somaiya Video : 'त्या' आक्षेपार्ह व्हिडीओवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, किळसावाणं...
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओच्या निषेधार्थ राज्यभरात आंदोलन सुरु आहेत. तर, या मुद्द्यावरुन अधिवेशनातही विरोधकांनी सरकराला घेरले आहे. यावर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ही प्रतिक्रिया आता चर्चेत आली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, किळसवाणे आणि बीभत्स व्हिडीओ मी बघत नाही. त्याच्यावर राज्यातील जनतेने प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांच्या भावनेची कदर सरकारने करावी, असे त्यांनी म्हंटले आहे.
तर, काल देशप्रेमी आणि लोकशाहीप्रेमी पक्षांची बैठक झाली असून आघाडी स्थापन झालेली आहे. तिचे नाव INDIA असे आहे. ही लढाई एका व्यक्ती किंवा पक्षाविरुध्द नसून हुकुमशाहीविरोधात लढाई आहे. पक्ष येत असतात जात-असतात. पंतप्रधान, मुख्यमंत्री सातत्याने येणारी-जाणारी असतात. म्हणून जो पायंडा पडत आहे. तो पायंडा देशासाठी घातक आहे. म्हणून सर्व जण लोकशाहीप्रेमी एकत्र येऊन या हुकुमशाहीविरुध्द एक मजबूत आघाडी निर्माण केली आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, किरीट सोमय्यांच्या व्हिडीओवरुन अधिवेशनात आज अंबादास दानवे आणि अनिल परब यांनी आक्रमक होत कारवाईची मागणी केली होती. याला देवेंद्र फडणवीसांनी उत्तर देताना महत्वपूर्ण घोषणा केली. हा विषय नक्कीच गंभीर आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. अशा प्रकारच कोणतही प्रकरण दाबणे, लपवणे, मागे टाकणे असं काहीही केलं जाणार नाही, असे फडणवीसांनी म्हंटले होते.