दि.बा. पाटलांच्या नावाला माझा विरोध नव्हताच, जे नाव दिले ते शिंदेंनीच; मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट
हर्षल भदाणे पाटील | नवी मुंबई : नवी मुंबईत होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोणाचे नाव द्यावे यावरून राज्यात घमासान सुरु आहे. राज्य सरकार शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा विचार करत आहे. तर, ठाणे, नवी मुंबईतील स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्तांनी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. परंतु, आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी 'दि.बा. पाटील यांच्या नावाला माझा विरोध नव्हताच. जे नाव दिले ते एकनाथ शिंदेंनी दिले, असा मोठा गौप्यस्फोट केला आहे
रायगड व नवी मुंबई प्रकल्पग्रस्त नेत्यांची आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी बैठक घेतली. सदर बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मराठी माणसात होणारे वाद थांबले पाहिजेत. माझे आजोबा व वडील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या हयातीत नावासाठी कधीही आग्रह केला नाही. ज्यावेळी विमानतळाला नाव द्यायचा विषय आला. त्यावेळी मीही सुचना केली होती कि जर नावाबाबत वाद असेल तर तो विषय संपवा. परंतु, तत्काळीन मंत्र्यांनी मला सांगितले कि मी जबाबदारी घेतो आणि सदर विषय मार्गी लावतो तुम्ही काळजी करु नका. त्यानंतर ना मला प्रकल्पग्रस्त समिती भेटली ना मंत्र्यांनी विषय काढला.
मी जर ठरवल असत तर कधीही मी सभागृहात विषय घेऊन मंजूर करुन नामकरण जबरदस्तीने केले असते. पण, मी जाणीवपूर्वक हा विषय आजतागयत सभागृहात घेतला नाही. नामांतरण विषय फक्त सिडको बैठकीत मंजूर झाला आहे. संभाजीनगर शहरासारख सभागृहात मंजूर झालेला विषय नाही. त्यामुळे काळजी नसावी. तसेच, शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसाची एकजुट अभेद्य रहावी म्हणून आपली हयात घालवली. त्याच शिवसेनाप्रमुखांच्या नावासाठी मी मराठी माणसात फुट पाडणार नाही विशेषताः आगरी कोळी समाजाचे शिवसेना पक्षावर खूप ऋण आहेत. त्यामुळे यापुढे आपण एकीने दि.बा. पाटील यांच्या नावासाठी आग्रही राहु, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
सदर बैठकीत आमदार बाळाराम पाटील, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबन पाटील, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, द्वारकानाथ भोईर, मनोहर भोईर, उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, रोहिदास पाटील, नगरसेवक एम के मढ़वी, सोमनाथ वास्कर, करण मढवी, चेतन नाईक, संजय तरे, शहरप्रमुख प्रवीण म्हात्रे, उपशहरप्रमुख सूर्यकांत मढवी, दीपक घरत, कॉंग्रेसचे महेंद्र घरत, प्रकल्पग्रस्त नेते राजाराम पाटील व मोठया संख्येने रायगड व नवी मुंबई प्रकल्पग्रस्त नेते उपस्थित होते.