ठाकरेंचं ठरलं! दसऱ्यानंतर करणार महाराष्ट्र दौरा...
राज्यातील सत्तासंघर्षानंतर सत्तापालट झाल्यावर शिवसेनेला (उद्धव ठाकरे गट) सत्तेतून पायउतार व्हावं लागलं होतं. त्यानंतर शिवसेनेतील अनेक नेते, पदाधिकारी हे शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर, शिंदेगटाकडून शिवसेना पक्षावर हक्क सांगितला गेला. शिवसेनेची परंपरा असलेला दसरा मेळावा कोण घेणार हा प्रश्न देखील न्यायलयामध्ये गेला. त्यानंतर शिवतीर्थ येथे दसरा मेळावा घेण्यासाठी न्यायालयाने शिवसेनेला परवानगी दिली त्यामुळे 5 ऑक्टोबर रोजी उद्धव ठाकरे हे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेणार आहेत.
उद्धव ठाकरेंनी केली महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा:
"दसरा मेळावे बरेच होतात. पंकजा ताईंचा सुद्धा होतो. पण, शिवसेनेचा दसरा मेळावा एकच मेळावा होतो आणि ते म्हणजे शिवाजी पार्कचा. दसऱ्यानंतर मी महाराष्ट्रामध्ये फिरायला सुरूवात करणार आहे. पोहरा देवीला सुद्धा जरूर जाईन. तिथून विदर्भातही जाणार आहे आणि संपुर्ण महाराष्ट्रच फिरणार आहे." अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
रामदास कदमांची टीका:
"उद्धव ठाकरेंनी सत्तेत असताना अडीच वर्षांत असा दौरा केला असता, आमदारांना वेळ दिला असता तर आज शिवसेनेचे दोन मेळावे झालेच नसते. शिवसेनेत अशी उभी फूट पडलीच नसती" अशी टीका शिंदेगटाचे आमदार रामदास कदमांनी केली आहे.