Uddhav Thackeray : मुख्यमंत्री, पंतप्रधान पदाचीही कंत्राटी भरती करा
मुंबई : सैन्यभरतीची अग्निपथ योजना (Agnipath scheme) जाहीर करण्यात आल्यानंतर देशाच्या अनेक भागात हिंसक आंदोलनं केली जात आहेत. या आंदोलनाची धग संपूर्ण देशात पसरत आहे. यावरून मुख्यमंत्री आणि शिवसेना अध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी अग्निपथ योजनेवर कडाडून टीका केली आहे. भाडोत्री सैन्यासारखे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान याचीही कंत्राटी भरती करा, असे त्यांनी म्हंटले आहे.
उध्दव ठाकरे म्हणाले की, अग्निपथमुळे तरुण रस्त्यावर उतरले आहेत. मी आधीच म्हंटले होते. ह्दयात राम आणि हाताला काम पाहिजे. आज तेच चित्र आज देशात. हाताला काम नसेल तर काही उपयोग नाही. आज लोक केवळ मंदिरांचे उद्घाटन करत आहे. तर, दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देऊ, अशा घोषणा द्यायचे. परंतु, प्रत्यक्षात काही नाही. नुसतेच योजनेचे मोठे नाव आहे. तसेच, अग्निवीर नुसते नाव मोठे. तीन-चार वर्षांनंतर नोकरीचा पत्ता नाही. तुम्ही त्याला मृगजल दाखवणार अणि लाखो मुले आली तर 10 टक्क्यांमध्ये कोणाला ठेवणार, असा सवाल त्यांनी विचारला आहे.
भाडोत्री सैन्याचे हा काय प्रकार आहे. मग, सगळच भाडोत्री करा. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान याचीही कंत्राटी भरती करा. त्यासाठी टेंडर काढा. आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे, पंतप्रधान पाहिजे असे प्रत्येक पाच वर्षांनी जाहिरात काढा, असा चिमटा उध्दव ठाकरेंनी मोदी सरकारला घेतला आहे.
देशातील अनेक राज्यात तरुण रस्त्यावर उतरला आहे. यामुळे अनेक राज्यात सैन्य बोलवायला लागले आहे. परंतु, महाराष्ट्र अजून शांत आहे. महाराष्ट्र पेटत नाही जेव्हा पेटतो तेव्हा समोरच्याला जाळून टाकतो, असेही उध्दव ठाकरे यांनी म्हंटले आहे.