भिडे फडणवीसांचे गुरूजी असतील तर…; उध्दव ठाकरेंचे टीकास्त्र
मुंबई : संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानाप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात निवेदन दिले. यावेळी फडणवीस यांनी गुरुजी असा उल्लेख केल्यानं वाद निर्माण झाला आहे. संभाजी भिडे यांना गुरुजी का म्हणता असा सवाल विरोधकांनी उपस्थित करत एकच गदारोळ केला. या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
उध्दव ठाकरे म्हणाले की, भिडे फडणवीसांचे गुरूजी असतील तर त्यांच्याकडून कारवाईची अपेक्षा कशी करणार? इतिहासाचे उत्खनन करायचे चालले आहे. इतिहास उगळायचा आणि भविष्य मारायचे काम सुरु आहे. महाराष्ट्रामध्येही त्यांनी सरकार फोडून सत्ता आणली. ते कधीच राज्यकर्ते होऊ शकत नाहीत, असा हल्लाबोल त्यांनी फडणवीसांवर केली आहे.
मणिपूर असो किंवा हरियाणा सध्या या राज्यांमधील परिस्थिती समोर दिसत असताना देखील काहीच पावलं उचलली जात नसतील तर ह्याला राम राज्य म्हणणार का? भाजप सरकार चालवू शकत नाही हे यावरून सिद्ध झालंय, असाही निशाणा उध्दव ठाकरेंनी साधला. तर, शरद पवारांच्या कालच्या भाषणातील मुद्दे बोलके होते, असेही त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई ह्यांच्या आत्महत्येची बातमी धक्कादायक आहे. त्यांची कामातील प्रचंड प्रतिभा अनेक नव्या प्रकल्पांना घडवत होती. त्यांचं असं जाणं मनाला न पटणारं आहे. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली, अशा भावना उध्दव ठाकरेंनी व्यक्त केल्या.