शेवटची कॅबिनेट बैठक? काही चुका झाल्यास माफ करा; मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
मुंबई : एकनाथ शिंदे गटाने बंड पुकारल्याने राज्याच्या राजकारणात मोठे वादळ निर्माण झाले आहे. राजकीय नाट्य आता शेवटच्या टप्प्यात आले असून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना बहुमत चाचणी सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. यामुळे आता ठाकरे सरकार जवळपास गेल्यात जमा आहे. अशातच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कॅबिनेट बैठक बोलवली होती. या बैठकीत त्यांनी सहकार्य केल्याबद्दल आभार मानले आहे.
राज्यपालांच्या फ्लोअर टेस्ट आदेशाविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात गेली आहे. यावर आज सुनावणी सुरु आहे. अशात मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट बैठक बोलवली असून महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यावेळी उध्दव ठाकरे म्हणाले की, अडीच वर्षात मला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद करतो. मला माझ्याच लोकांनी धोका दिला आहे. यामुळे ही परिस्थिती ओढावली. कायदेशीर लढाई लढत राहू. माझ्याकडून कोणाचा अपमान झाल्यास अथवा कोणी दुखावल्यास माफी असावी. काही चुका झाला असल्यास माफ करा, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले. यामुळे आजची कॅबिनेट बैठक शेवटची होती का, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. तर, आजच्या कॅबिनेट बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत औरंगाबादचे नाव संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशीव करण्यावर शिक्कामोर्तब केला आहे.
दरम्यान, राज्यपालांच्या फ्लोअर टेस्ट आदेशाविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात गेली आहे. यावर आज सुनावणी सुरु आहे. बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याच्या उपसभापतींच्या कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने 11 जुलैपर्यंत स्थगिती दिल्याचा उद्धव सरकारचा युक्तिवाद आहे. अशा स्थितीत राज्यपालांनी विश्वास दर्शक ठरावाचा आदेश देणे योग्य नाही, असा दावा केला गेला आहे. यावर सुप्रीम कोर्ट काय निर्णय देते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.