निवडणुकीच्या तयारीला लागा, तुमच्यातलेच आमदार-खासदार असणार; उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. तर, दुसरीकडे उध्दव ठाकरे यांना धक्क्यांवर धक्के देत नेते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांची आज सेनाभवनात बैठक पार पडली. या बैठकीत उध्दव ठाकरेंनी जिल्हाप्रमुखांना महत्वपूर्ण सूचना दिल्या आहेत.निवडणुकीच्या तयारीला लागा, तुमच्यातलेच आमदार-खासदार असणार आहेत, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.
आगामी निवडणुका आणि महाविकास आघाडीच्या संयुक्त सभा या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरेंनी आज जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली. यामध्ये तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून अडकवण्याचा प्रयत्न करतील तुम्ही घाबरू नका. निवडणुकीच्या तयारीला लागा, तुमच्यातलेच आमदार-खासदार असणार आहेत, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख, जिल्हा संपर्कप्रमुखांना दिल्या आहेत.
तर, याआधी निवडणूका येतील आणि जातील पण ही निवडणूक जर हरलो तर मग 2024ची निवडणूक ही शेवटची असेल. मी नसलो तरी चालेल पण लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, अशी भावनिक साद उध्दव ठाकरे यांनी घातली आहे. महाविकास आघाडीची आज संयुक्त बैठकीत ते बोलत होते.
दरम्यान, काहीच दिवसांपुर्वी उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे नेते सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. तर बबनराव घोलप यांची कन्या तनुजा घोलप यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. आता दीपक सावंत यांनी बाळासाहेब भवनमध्ये एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला आहे.