पद झेपत नसेल तर सोडा; उदयनराजे भोसलेंची राज्यपालांवर टीका
सातारा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. त्यावर एकच राजकीय वर्तुळासह संपूर्ण महाराष्ट्रातून राज्यपालांवर टीका होत आहे. राज्यपालांवर भाजप नेते उदयनराजे भोसले यांनीही टीका केली आहे. पद झेपत नसेल तर सोडा, असे उदयनराजेंनी म्हंटले आहे.
उदयनराजे भोसले म्हणाले की, राज्यपालांना शिवरायांच्या इतिहासाचे विस्मरण होत असेल किंवा त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली असेल. राज्यपाल मोठे पद असून त्यांना ते झेपत नसेल तर त्यांना त्या पदावरून बाजूला केले पाहिजे. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांनी शिवरायांचा इतिहास वाचला तर बरे होईल. तशीही विकृती असू शकते, अशा शब्दात त्यांनी कोश्यारींवर टीकास्त्र डागले आहे.
तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना घरचा आदेश दिला आहे. जोपर्यंत सूर्य आणि चंद्र पृथ्वीवर आहे तोपर्यंत महाराष्ट्र आणि देशाचे आणि आमच्या सर्वांचे आदर्श हे छत्रपती शिवाजी महाराज हेच राहणार आहेत. आजच्या भाषेत सांगायचे झाले तर आमचे हिरोदेखील छत्रपती शिवाजी महाराज हेच आहेत. याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.
काय म्हणाले होते राज्यपाल?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी बोलत होते. यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी डीलिट पदवी देऊन गौरवण्यात आलं. यावेळी भाषण करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली.
आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो. तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण आहे? महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील, असं वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे.