अजित पवारांना उदयनराजेंचं आव्हान, ईडी चौकशीला सामोरे जाण्याचंही निमंत्रण
Udayanraje Bhosale Challenge to Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विकासकामांवरून उदयनराजेंना फटकारलं होतं. साता-याच्या एमआयडीसीमधील (MIDC) खंडणीबाबत अजित पवारांनी नाव न घेता उदयनराजेंचा समाचार घेतला. तसेच एमआयडीसीत उद्योग का येत नाहीत? असा सवाल विचारत उदयनराजेंना फटकारलं होतं. अजित पवार (Ajit Pawar) रविवारी साताऱ्यातील माण तालुक्यात एका कार्यक्रमानिमित्त आले होते. यावेळी ते बोलत होते. (Udayanraje Bhosale challenge to Ajit Pawar over ed enquiry)
दरम्यान, 'हिंमत असेल सगळ्यांची ईडी चौकशी करा. कोणत्याही चौकशीला घाबरत नसल्याचे उदयनराजे भोसले यांनी ठणकावत म्हटलं आहे. 'मी भ्रष्टाचाराविरोधात उघडपणे बोलतो. कोण काय बोललं मला माहित नाही. हिंमत असेल समोरासमोर यावं. सगळे मिळून ईडी चौकशीला सामोरे जाऊ. पहिली माझी चौकशी करा. तुमच्यात दम असेल तर तुमची चौकशी करायला ईडीला सांगा.' असं आव्हान देखील उदयनराजे भोसले यांनी दिलं आहे. साताऱ्यातील एमआयडीसीचा विकास हा टक्केवारीच्या नेत्यांमुळे रखडला असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. त्यावर उत्तर देताना खासदार उदयनराजे भोसले यांनी आज ही प्रतिक्रिया दिली आहे.