मारहाणीनंतर रोशनी शिंदे यांच्यावरच ठाण्यात दोन गुन्हे दाखल
ठाणे : ठाण्यात शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या एका महिला कार्यकर्त्याला मारहाण केल्याची घटना घडली होती. यावरुन राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. अशातच, रोशनी शिंदे यांच्याविरोधातच ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आला आहे. यामुळे ठाकरे गट आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे.
ठाण्यातील कासारवडवली परिसरात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना सोमवारी रात्री शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप करत मारहाण केली होती. या मारहाणीनंतर रोशनी शिंदे यांनी आपल्याला झालेल्या मारहाणीची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची लेखी तक्रार देखील दाखल केली होती. या अर्जाद्वारे केलेल्या तक्रारीची चौकशी सुरू असून चौकशी अंती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होणार असल्याचे अप्पर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांनी सांगितले आहे. मात्र, त्यानंतर रोशनी शिंदे यांच्याच अडचणीत वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
4 एप्रिल रोजी संध्याकाळी रोशनी शिंदे यांच्या विरोधात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. पहिला गुन्हा कासारवडवली पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे दत्ताराम गवस यांच्या तक्रारीवरून आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे रोशनी शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी भाजप पदाधिकारी संजय वाघोले यांनी देखील गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, रोशनी शिंदे यांची उध्दव ठाकरे यांनी रुग्णालयात भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली होती. तसेच, एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे. केवळ उपमुख्यमंत्रीपद मिरवलं आणि चमकायचं हेच ते करत आहेत. फडतूस गृहमंत्र्याला पदावर बसण्याचा अधिकार नाही. ताबडतोब गृहमंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही उध्दव ठाकरेंनी केली होती.