कर्नाटकमध्ये आंदोलन होऊ नये म्हणून दौरा रद्द; फडणवीसांचे स्पष्टीकरण
मुंबई : महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये, असा इशाराच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मंत्र्यांना दिला आहे. यावरुन राज्यात मोठा गदारोळ झाला होता. यानंतर सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई यांनी दौरा रद्द केल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. यावर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. कर्नाटकात आंदोलन होऊ नये म्हणून दौरा रद्द करण्यात आल्याचे फडणवीसांनी सांगितले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सीमावादाचा निर्णय सर्वोच्च न्यायालय घेणार आहे. राज्याने ताकदीने हा विषय मांडला आहे. मंत्र्यांचा दौरा होता तो महापरिनिर्वाण दिनानिमित्त होता. कार्यक्रमाला मंत्री जाणार होते. पण, तिकडे आंदोलन होऊ नये म्हणून दौरा रद्द करण्यात आला. महापरिनिर्वाण दिनी आपण असा वाद करायचा का? महापरिनिर्वाण दिन हा आपल्यासाठी मोठा दिवस आहे. त्यामुळे या दिनी एखादं आंदोलन होऊ नये म्हणून हा दौरा रद्द केलाय. अन्यथा आम्हाला तिकडे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हंटले होते. याचा सर्वच स्तरावरुन निषेध करण्यात आला होता. तर, चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांनी बेळगावात जाणारच, असा निर्धार केला होता. परंतु, अचानकपणे मंत्र्याचा बेळगाव दौरा रद्द करण्यात आला आहे. यामुळे विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी तर डरपोक सरकार म्हणत शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.