राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आज वाढदिवस; या निमित्ताने मंत्रालय परिसरात बॅनरबाजी
राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा आज (सोमवारी दि. 22) वाढदिवस आहे. या वाढदिवसांच्या निमित्ताने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना एक दिवस आधीच शुभेच्छा मिळतानाच चित्र दिसून येत आहेत. दोन्ही नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्रालय आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर बॅनरबाजी करण्यात आली आहे. भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचा या बॅनरवर उल्लेख करण्यात आला आहे. कालपेक्षा आज अधिक बॅनर लावले असल्याचं पाहायला मिळत आहे.
उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे काल पुणे, पिंपरी-चिंचवड दौऱ्यावरती होते. या दौऱ्यावेळी त्यांच्या समर्थकांनी वाढदिवसाच्या एक दिवस आधीच केक कापत त्यांचा जन्मदिवस साजरा केला. पण यावेळी त्यांच्या केकची चर्चा सुरु झाली. अजित पवारांसाठी आणलेल्या केकवरती 'मी अजित आशा अनंतराव पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की...!', असं लिहण्यात आलेलं होतं.
वाढदिवसानिमित्त अजित दादा समर्थकांनी त्यांना मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा दिल्या. याआधीही अजित पवार यांच्या नावाचे राज्यात भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागलेले आहेत. अजित पवार हे कायम वेटिंग सीएम म्हणून चर्चेत आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडण्यापूर्वी एकत्रित राष्ट्रवादीच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपदाची संधी चालून आली असताना पक्ष नेतृत्वाने ती स्वीकारली नाही याची खंत व्यक्त केली होती.अजित पवार पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले. नुकताच त्यांनी विक्रमी दहाव्यांदा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही या अर्थसंकल्पातील महत्त्वाकांक्षी योजना आहे.