Abhishek Ghosalkar: अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणात मुंबई हायकोर्टाचे 'हे' महत्त्वाचे निर्देश
शिवसेना नेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक घोसाळकर यांची काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात आता घोसाळकर कुटुंबीयांनी मुंबई पोलिसांच्या तपासाबाबत गंभीर आरोप केले आहेत. मुंबई पोलीस या हत्याप्रकरणाच्या तपासात खूप घाई करत आहेत. अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा सखोल तपास करा आणि दोन आठवड्यांत अहवाल सादर करा, असे निर्देश हायकोर्टाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा किंवा त्यासाठी विशेष तपास पथक नेमावे, अशी मागणी करणारी याचिका अभिषेक यांच्या पत्नी तेजस्वी यांनी हायकोर्टात दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान हायकोर्टाने हे आदेश दिले आहेत.
मात्र, मुंबई पोलिसांनी केवळ 60 दिवसांतच तपास आटोपून आरोपपत्र दाखल केले. मूळ तक्रारदार असलेल्या अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर यांचे म्हणणे मुंबई पोलिसांनी नीट ऐकून घेतले नाही, असेही घोसाळकर कुटुंबीयांकडून उच्च न्यायालयात सांगण्यात आले. गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यासाठी 90 दिवसांची मुदत असते. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येच्या सर्व बाजूंनी तपास करणे आवश्यक आहे. त्यासाठी घटनेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज आणि सीडीआर ताब्यात घेत सखोल चौकशी करावी, असे न्यायालयाकडून सांगण्यात आले. याप्रकरणाची पुढील सुनावणी 6 मे रोजी होईल.
दरम्यान, अभिषेक घोसाळकर हे शिवसेनेचे माजी नगरसेवक होते. त्यामुळे या घटनेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. ठाकरे गटाकडून याप्रकरणात अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. मात्र, आतापर्यंत पोलिसांच्या तपासातून याप्रकरणात फार काही विशेष निष्पन्न झालेले नाही. त्यामुळे आता उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मुंबई पोलीस पुढील सुनावणीत न्यायालयात काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.