अवकाळी पावसाचा 'या' जिल्ह्याला हवामान विभागाने दिला इशारा
कल्पना नलसकर | नागपूर : राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळीचा फटका बसलत आहे. यामुळे शेतपीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी संकटात सापडला आहे. अशातच, पुन्हा एकदा हवामान खात्याने विदर्भाला पावसाचा इशारा दिला आहे. येत्या 13 व 14 तारखेला विदर्भात पुन्हा पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. ते संपत नाही तर याच एप्रिल महिन्यात पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतीपिकांचे मोठे नुकसान केले. आता पुन्हा 13 व 14 एप्रिलला विदर्भात पावसाचा अंदाज नागपूर वेधशाळेने व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागरात अँटीसायक्लोनिक स्थिती निर्माण झाली आहे. तेथून येणाऱ्या आद्रता वाऱ्यामुळे तापमानात घट होईल. मात्र, 14 एप्रिल नंतर हवामानात बदल होऊन तापमानात वाढ होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.