...तीच भगिनींना दिलेली खरी ओवाळणी ठरेल; मुख्यमंत्र्यांनी साजरी केली रक्षाबंधन
मुंबई : रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त आज त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आधार आश्रम ट्रस्ट या संस्थेतील राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विधानभवनात राखी बांधली. यावेळी त्यांच्याकडून राखी बांधून घेताना पुन्हा अशी वेळ कोणत्याही भगिनीवर येणार नाही, असा निर्धार मुख्यमंत्र्यांनी केला.
एकनाथ शिंदे म्हणाले की, पुन्हा अशी वेळ कोणत्याही भगिनीवर येऊ नये यासाठी शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र घडवणे ही या युती सरकारची प्राथमिकता असून त्या दिशेने पावले उचलायला सरकारने सुरुवात केलेली आहे. ज्या दिवशी या राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबून तो सुजलाम सुफलाम होईल तीच या भगिनींना दिलेली खरी ओवाळणी ठरेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी शक्य ते सारे प्रयत्न करण्याची ग्वाहीही मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी दिली.
तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयासमोरील पोलीस चौकीत पोलीस भगिनींकडून राखी बांधून घेत रक्षाबंधन साजरा केला. राज्यात युती सरकार सत्तेत आल्यापासून पोलिसांच्या घरांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी प्राथमिकता दिलेली आहे.
पोलीस घरांची परिस्थिती पाहण्यासाठी त्यांनी स्वतः बोरिवली पोलीस कॉलनीला भेट देऊन या घरांची पाहणी केली होती. त्यानंतर पोलीस घरांच्या प्रश्नांवर त्यांनी मंत्रालयात विशेष बैठक घेऊन या कामाना गती देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यामुळे हा सण पोलीस भगिनींसोबत साजरा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दादाजी भुसे, आमदार संजय शिरसाट हेदेखील उपस्थित होते.