सीमाप्रश्न चिघळणार! महाराष्ट्रातील 'त्या' ४० गावांवर दावा करणार : कर्नाटक मुख्यमंत्री
मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रकरणी दोन्ही राज्यांच्या बैठका सुरु आहेत. अशातच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रासोबतच्या सीमा विवादाबाबत सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढा देण्यास तयार असल्याचे वक्तव्य केले आहे. तर, महाराष्ट्रातील काही गावे कर्नाटकात विलीन होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. यामुळे राज्यात एकच खळबळ निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न अजूनही सुटला नसताना आता कर्नाटक राज्य सरकारकडून नवी कुरापत सुरू आहे. महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर कर्नाटक दावा सांगण्याचा गांभीर्यानं विचार करत असल्याचं कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितलं आहे.
सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा दुष्काळी आहे. तिथे पाण्याची तीव्र टंचाई भासते. यामुळं तेथील 40 ग्रामपंचायतींनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव केला आहे. याच ठरावावर कर्नाटक सरकार विचार करत असल्याचं बोम्मई यांनी सांगितलं. याशिवाय महाराष्ट्रात ज्या ठिकाणी कन्नड शाळा आहेत त्या शाळांचा विकास कर्नाटक सीमा विकास प्राधिकरणामार्फत निधी दिला जाणार आहे.
तर, सीमा भागातील प्रश्नाबाबत मी मंगळवारी वकिलांच्या टीमसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स घेणार आहे. यासंदर्भात सरकारने कोणती पावले उचलली आहेत, याबाबत दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेत्यांना पत्रे पाठवण्यात येणार आहेत. सुप्रीम कोर्टात आमची बाजू मांडण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार असल्याचे सांगत बोम्मई यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, बोम्मई यांनी महाराष्ट्रातील राजकारणावर टीका केली आहे. सीमावाद हे महाराष्ट्रात राजकीय हत्यार बनले आहे आणि सत्तेत असलेला कोणताही पक्ष राजकीय हेतूने हा मुद्दा उपस्थित करत राहतो. परंतु, त्यांना अद्याप यश मिळालेले नाही आणि भविष्यातही मिळणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.