Lok Sabha Election 2024: 'या' दिवशी होणार लोकसभा निवडणुकीची घोषणा
केंद्रीय निवडणूक आयोगाचा जम्मू-काश्मीरचा पाहणी दौरा झाल्यानंतर 14 किंवा 15 मार्च रोजी लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. आयोगाने बहुसंख्य राज्यांचा निवडणूकपूर्व आढावा घेतला असून सोमवार ते बुधवार (11 ते 13 मार्च) या तीन दिवसांत तीनही निवडणूक आयुक्त जम्मू विभाग तसेच काश्मीर खोऱ्याला भेट देतील.
केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जम्मू व काश्मीरमधील कायदा-सुव्यवस्थेसंदर्भात दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीमध्ये संपूर्ण माहिती पुरवलेली आहे. गृह मंत्रालयाने दिलेल्या तपशिलाच्या आधारे केंद्रीय निवडणूक आयोग जम्मू व काश्मीर या दोन्ही विभागांचा आढावा घेईल. सर्वोच्च न्यायालयाने जम्मू व काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक घेण्यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाला आढावा घेण्याचे आदेश दिले होते.
गेल्या डिसेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला जम्मू-काश्मीरमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत विधानसभा निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र आता केंद्रशासित प्रदेशात लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभा निवडणुकाही होऊ शकते, असे मानले जात आहे.
दरम्यान, आयोगाने शुक्रवारी गृह मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयाच्या उच्च अधिकाऱ्यांशी या विषयावर बैठका घेतल्या. आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकांसह जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका घेण्याच्या शक्यतेवर निवडणूक आयोगाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे समजते.