ठाकरेंची 'मशाल' धोक्यात? आज हायकोर्टात दाखल होणार चिन्हा विरोधी याचिका
राज्यात एकीकडे अभूतपूर्व गोंधळ घडताना दिसत आहे. अशातच मोठ्या राजकीय घडामोडींनंतर ठाकरे गटाला नवे नाव आणि चिन्ह मिळाले आहे. ठाकरे गटाचे शिवसैनिक चिन्ह मिळाल्याचा आनंद साजरी करत असतानाच आता त्यांच्या आनंदात विरझन पडले आहे. समता पार्टीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या 'मशाल' चिन्हाला विरोध केला असून आज त्यांच्याकडून दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली जाणार आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीत मशाल चिन्ह देऊ नये' समता पक्ष आज दिल्ली हायकोर्टात बाजू मांडणार. उद्धव ठाकरे यांच्यासमोरील अडचणी काही केल्या संपताना दिसत नाहीत. आधी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर ‘धगधगती मशाल’ ठाकरेंना मिळाली, त्यानंतर ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असतानाच आता ‘मशाल’ही अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जॉर्ज फर्नांडिस यांनी स्थापन केलेल्या समता पक्षाने मशाल हे आपले निवडणूक चिन्ह असल्याचा दावा केला आहे. त्यामुळं समता पार्टीनं शिवसेनेच्या चिन्हाला विरोध केला असून आज दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करणार आहे.समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांनी यासंदर्भात दिल्ली हायकोर्टात आज याचिका दाखल करणार आहेत.
त्यावर बोलताना मंडल म्हणाले की, शिवसेनेला जे मशाल निशाण दिलं आहे त्यावर माझा आक्षेप आहे. यासाठी आम्ही दिल्ली हायकोर्टात एक याचिका दाखल करणार आहोत. कारण मशाल चिन्ह ही अजूनही समता पार्टीची ओळख आहे. हे चिन्ह समता पार्टीसाठी राखीव ठेवण्यात आलं आहे. यामुळं निवडणूक आयोगानं शिवसेनेला हे चिन्ह कसं काय दिलं याचं मला आश्चर्य वाटतं आहे. यावरून समता पार्टीकडून हरकत घेत १९९४ पासून राष्ट्रीयीकृत मशाल हे चिन्ह आमचे आहे असा दावा करण्यात आलाय.