'ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक'; मुलाच्या पक्षप्रवेशावर देसाई नाराज
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये शाब्दिक वाद सुरु असताना आता त्यातच आज ठाकरे गटाला धक्का देणारी बातमी समोर आली. उध्दव ठाकरेंचे विश्वासू मानले जाणारे सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटामध्ये एकच खळबळ माजली आहे. त्यावरच आता ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया देत याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
काय म्हणाले सुभाष देसाई?
सुभाष देसाई यांनी भूषण देसाई यांच्या प्रवेशाबाबत ते म्हणाले की, माझा मुलगा भूषण देसाई याने आज शिंदे गटात प्रवेश केला ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे. त्याचे शिवसेनेत किंवा राजकारणात कोणतेच काम नाही. त्यामुळे त्याच्या कुठल्याही पक्षात जाण्याने शिवसेनेवर अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. अशी टीका त्यांनी यावेळी केली.
पुढे ते म्हणाले की, शिवसेना, वंदनीय बाळासाहेब, उद्धवसाहेब व मातोश्रीशी मागील पाच दशकांहून अधिक काळापासून असलेली माझी निष्ठा तशीच अढळ राहील. वयाच्या या टप्प्यावर मी खूप काही करण्याची घोषणा करणार नाही. मात्र इथून पुढेसुद्धा संपूर्ण न्याय मिळेपर्यंत व शिवसेनेचे गतवैभव परत मिळेपर्यंत मी असंख्य शिवसैनिकांच्या सोबतीने माझे कार्य सुरु ठेवणार आहे. अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.