Sanjay Raut : केसीआर यांचा महाराष्ट्र दौरा; संजय राऊतांनी केला हल्लाबोल
मुंबई: राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरू आहे. त्यातच दुसरीकडे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या घडामोडी घडत असताना तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. नांदेड, छ. संभाजीनगर येथे सभा पार पडल्यानंतर आता राव संपूर्ण मंत्रिमंडळासह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेणार आहेत. मात्र, चंद्रशेखर राव यांच्या याच दौऱ्यावरून संजय राऊत यांनी टीका केली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
चंद्रशेखर राव यांच्या दौऱ्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, केसीआर यांची नियत चांगली नाही. त्यांनी ठरवायला हवे की कुणाला मदत करायला पाहिजे. ते एकीकडे म्हणतात की देशात हुकुमशाही आहे. मोदी सरकार आम्हाला राज्यात काम करू देत नाही. आमच्या नेत्यांवर ईडी, सीबीआयच्या धाडी पडतात. त्यांच्या मुलीची चौकशी केली. आता एकत्र येऊन लढायचे की त्यांना मदत होईल असे राजकारण करायचे? आम्ही हुकुमशाहीविरोधात लढतो आहोत. असे ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, केसीआर यांचा काँग्रेसला विरोध आहे का, हे त्यांनी स्पष्ट करावे. राज्याराज्यात राजकीय स्थिती वेगळी असते. तेलंगणात केसीआर यांना भाजपचा विरोध नाही. तर तेथे त्यांच्यापुढे काँग्रेसचे आव्हान आहे. यातून भाजपने दाबावाचे राजकारण सुरू केले असेल तर हे धोकादायक आहे. भारतीय जनता पक्षाने सोडलेले मोहरे किंवा घोडे यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांना किती मते पडतील या पुढचा प्रश्न आहे. त्यांची आर्थिक ताकद मोठी आहे. त्यांनी राज्यात पैशांचा खेळ सुरू केला आहे. अशी टीका राऊतांनी यावेळी केली.