ठाकरे गटाचे नेते अनिल देसाईंना आर्थिक गुन्हे शाखेचे समन्स
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते अनिल देसाई यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं शनिवारी समन्स बजावलं. अनिल देसाई यांना 5 मार्चला चौकशीसाठी बोलावलं असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त निशिथ मिश्रा यांनी दिली आहे. शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावले आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटालाच खरी शिवसेना घोषित केल्यानंतरही उद्धव गटाकडून पक्षनिधी काढल्याचा शिंदे गटाचा आरोप आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना (शिंदे गट) पक्षाचा कर कोण भरत आहे याची माहिती देण्यासाठी EOW ने आयकर विभागाला पत्र लिहून माहिती मागवली आहे. ठाकरे गटाने शिवसेनेच्या पक्षनिधीतून 50 कोटी रुपये काढल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे. दरम्यान, अनिल देसाई यांना समन्स आल्याने आगामी काळात पक्षनिधीचा वाद चव्हाट्यावर येणार आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला फेब्रुवारी 2023 मध्ये खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली. मात्र, निवडणूक आयोगाच्या निर्णयाला बगल देत उद्धव ठाकरे गटानं अधिकृत असलेल्या शिवसेनेच्या बँक खात्याचं टीडीएस आणि प्राप्तिकर विवरणपत्र भरल्याप्रकरणी तक्रार करण्यात आली आहे.
अनिल देसाई हे मातोश्रीच्या जवळचे मानले जातात आणि यावेळी ते मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार असू शकतात. याआधी महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे दोन तुकडे केले तेव्हा बरेच राजकारण पाहायला मिळाले होते. या काळात एकनाथ शिंदे यांच्यावर उद्धव ठाकरेंनी जोरदार हल्ला चढवला. मात्र हे प्रकरण निवडणूक आयोगासमोर पोहोचल्यावर निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचे जाहीर केले.