गुलाबराव पाटलांच्या त्या विधानाचा उध्दव ठाकरेंनी घेतला समाचार; म्हणाले, अशा घुसा खूप पाहिल्या...
शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज जळगावमधील पाचोरा येथे जाहीर सभा पार पडली. दरम्यान, सभेआधी सभेवरून मंत्री गुलाबराव पाटील यांनी इशारा दिला होता. आम्ही दगड मारून सभा, आंदोलनं उधळून टाकणारी लोक आहोत, असं पाटलांनी म्हटलं होतं. मात्र, त्यांच्या या विधानामुळे शिंदे गटात आणि ठाकरे गटात चांगलाच वाद पाहायला मिळाला. त्यावरूनच सभेत बोलताना उध्दव ठाकरेंनी देखील गुलाबराव पाटलांच्या विधानाचा समाचार घेतला.
नेमकं काय म्हणाले उध्दव ठाकरे?
पाचोरामधील सभेत बोलताना उध्दव ठाकरें म्हणाले की,'या सभेला जमलेली गर्दी पाहिल्यानंतर हे कळतं की शिवसेना कुणाची आहे. पाकिस्तान सुद्धा सांगेल की शिवसेना कुणाची आहे. पण आपल्याकडे मोतीबिंदू झालेल्या निवडणूक आयोगाला हे कळत नाही. मात्र, तो त्यांचा दोष आहे. त्यानंतर काही जणांना वाटलं की ते म्हणजेच शिवसेना. मग काय म्हणाले की आम्ही सभेत घुसणार?, आम्ही अशा घुसा खूप पाहिल्या आहेत. घुशींना बिळातून बाहेर काढून आपटणार' असे ठाकरे यावेळी म्हणाले.
यावरून ठाकरेंनी भाषणाच्या शेवटी देखील गुलाबराव पाटलांना इशारा दिला. ते म्हणाले, 'मी वाट बघत होतो, घुसणारे कधी घुसणार आहेत, पण ते घुसले नाहीत. संजय राऊत जे बोलले होते, की घुसणारे परत जाणार नाहीत. आम्ही अजूनही शांत आहोत, याचा अर्थ आम्ही नामर्द नाहीत', अस बोलत त्यांनी गुलाबराव पाटलांवर टीका केली.