"मोगॅम्बो खुश हुआ" अमित शाहांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे जोरदार उत्तर
राज्यात सध्या प्रचंड राजकीय घडामोडी घडत आहे. त्यातच दुसरीकडे नुकताच केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह हे शिंदे गटाला बहाल केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यावरून आता शिंदे गट आणि ठाकरे गटातील वाद आणखीच तीव्र झाला आहे. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी शाह यांनी या निर्णयावरून शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्याच टीकेला आता उद्धव ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
उत्तर भारतीयांच्या मेळाव्याप्रसंगी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, काल पुण्यात कोणी आले होते, त्यांनी विचारले महाराष्ट्रात कसे काय सुरु आहे. त्यानंतर ते म्हणाले आज खूपच चांगला दिवस आहे. कारण शिवसेनेचे नाव आणि चिन्ह आपल्यासोबत जे गुलाम आले आहेत, त्यांना दिलं. तर ते म्हणाले खूपच छान, मोगॅम्बो खुश हुआ. अशी टीका ठाकरेंनी यांनी नाव न घेता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केली.
पुढे ते म्हणाले की, मोगॅम्बो काल म्हणाला की मी मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादीचे तळवे चाटले. पण आत्ता जे काही राज्यात चाललं आहे त्यात कोण कोणाचं काय चाटतं आहे? तेच कळायला मार्ग नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी खोचक शब्दांमध्ये अमित शाह यांना उत्तर दिलं आहे. आता जे काही राज्यात सुरू आहे ती कुठली चाटुगिरी आहे? कोण कोणाचा कुठला भाग चाटतो आहे? असा खोचक प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. हे मोगॅम्बो आहेत. तुम्ही मिस्टर इंडिया चित्रपट आठवला तर त्यात मोगॅम्बोला हेच हवे होते. देशात आपापसात लढाई व्हावी. लोक आपसात लढत राहिले, तर मी राज्य करेन. आजचे मोगॅम्बो हेच तर आहेत. हिंदू असाल तरी लढा, आमच्यासोबत जे आहेत, तेच आमचे. हिंदू असो की कोणी दुसरा, त्याने फरक पडत नाही. असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
माझा चोरलेला धनुष्यबाण घेऊन माझ्यासमोर या...
काल त्यांनी माझा धनुष्यबाण हिसकावून घेतला, आता स्वत: प्रभूरामचंद्र माझ्यासोबत आले आहेत. हा योगायोग म्हणावा की आणखी काय माहीत नाही. परंतु असं कधीकधी अशा गोष्टी होत असतात. मी तर काल रस्त्यावर उतरून आव्हान दिलं आहे. ज्या लोकांनी माझ्या पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हिसकावला आहे, त्यांना मी आव्हान दिलं आहे की जर तुम्ही मर्द असाल, तुमच्याच हिंमत असेल तर तुम्ही माझा चोरलेला धनुष्यबाण घेऊन माझ्यासमोर या, मी माझी मशाल घेऊन समोर येतो पाहूयात काय होतं? असे आव्हान ठाकरेंनी शिंदे गटाला आणि भाजपला दिले.