ठाकरे गटाला नागपुरात धक्का! जिल्हा समन्वयक दिलीप माथनकर यांचा भाजपात प्रवेश
कल्पना नलसकर | नागपूर : नागपूर जिल्हा समन्वयक माजी उपजिल्हाप्रमुख दिलीप माथनकर यांनी ठाकरे गटाची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. नागपूर येथील उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी देवगिरी येथे दिलीप माथनकर यांनी पक्षप्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दिलीप माथनकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्याने नाराजी व्यक्त केली होती. नागपूर शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार मागे घेतल्यानंतर काँग्रेससाठी ही जागा सोडल्याने त्यांनी उघड टीका करीत शिवसेना पक्षाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर त्यांची जिल्हा समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली होती. राज्यात शिवसेना व भाजपाची युती मागील अनेक वर्षापासून आहे. परंतु, उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचे विचार सोडून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आघाडी करून सरकार स्थापन केले.
शिवसेना हा भाजपाचा वैचारिक मित्र असताना शिवसैनिकांना विश्वासात न घेता उद्धव ठाकरे यांनी वैचारिक शत्रू असलेल्या पक्षांसोबत आघाडी केली. यामुळे शिवसैनिकांत अस्वस्थता असून त्यांनी काय करावे हेच सुचत नाही, असे मत दिलीप माथनकर यांनी व्यक्त केले. तसेच, भाजपामध्ये प्रवेश करून हिंदुत्वाच्या विचारांवर काम करता येईल असा निश्चय केल्याने निर्णय घेतला, असे यावेळी त्यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांनी भाजपात योग्य सन्मान दिला जाईल, असा शब्द माथनकर यांना दिला. यावेळी आमदार मोहन मते माजी महापौर संदीप जोशी, धनोजे कुणबी समाजाचे अध्यक्ष गजेंद्र आसोटकर, डॉ. अभय दातारकर, प्रफुल वाहादुडे, प्रशांत घोरमारे, सीए कैलास अडकिने, राजेंद्र नाकाडे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.